इरफान खानच्या निधनाने राजकीय नेते मंडळी शोकाकुल; ‘यांनी’ वाहिली श्रद्धांजली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे आज मुंबईतील कोकिलाबेन रुग्णासयात कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. तो ५४ वर्षांचा होता. इरफान खानच्या निधनाने संपूर्ण अभिनय क्षेत्र दु:खी झाले असून देशातील राजकीय वर्तुळात देखील या वृत्ताने दु:खी वातावरण आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कर्नाटक मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही अभिनेता इरफान खान याच्या निधनाबाबत ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन इरफानला श्रद्धांजली अर्पण केली आहे. ”इरफान खानच्या निधनाने चित्रपट तसेच नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान झालं आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्याने साकारलेल्या अष्टपैलू भूमिकांसाठी तो कायमच आपल्या लक्षात राहील. माझ्या सद्भावना त्याचे कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांबरोबर आहेत. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो,” असं मोदींनी इरफानला श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनीही अभिनेता इरफान खान याच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. इरफान खान हा एक अष्टपैलू अभिनेता असल्याचे शहा आणि जावडेकर यांनी म्हटले आहे. इरफान खानला आंतरराष्ट्रीय कीर्तीही मिळाली होती. देशाने एक प्रतिभावान अभिनेता आणि चांगला माणूस गमावला आहे, असे शहा यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा इरफान खानच्या निधनावर शोक व्यक्त केला. ”अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. दुर्धर असा कॅन्सर झाला असून सुद्धा न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले.दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी इरफान खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.” अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी इरफान खानला श्रद्धांजली वाहिली.

”इरफान खान हा एक अष्टपैलू आणि बुद्धिमान अभिनेता होता. तो जागतिक पातळीवर भारतीय सिनेमाचा एक ब्रँड अम्बेसिडर होता. इरफानखान कायम स्मरणात राहील,” अशा शब्दात काँग्रसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी इरफान खान याच्या कार्याचा गौरव करत शोक व्यक्त केला आहे.

”अभिनेता इरफान खान याच्या निधनाचे वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तो अतिशय वेगळा असा प्रतिभावान अभिनेता होता,त्याचा अभिनय कायम स्मरणात राहील” अशा शब्दांत केजरीवाल यांनी इरफान खान याच्या अभिनयाचा गौरव केला आहे.”

अभिनेता इरफान खान याच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. आपल्या देशातील अष्टपैलू अभिनेत्यांमध्ये इरफान खानची गणना होते”, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. महत्वाची बाब म्हणजे इरफान खान हा राजस्थानच्या जयपूर येथून बॉलीवूडमध्ये आला होता.

”अभिनेता इरफान खान याच्या निधनाबाबत ऐकून अतिशय दु:ख वाटत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनय करणारा इरफान हा दुर्मिळ आणि उत्कृष्ट अभिनेता होता,” अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपचे नेते अखिलेश यादव यांनीही अभिनेता इरफान खानच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.” आपल्या सर्वांचा आवडता अभिनेता इरफान खानला आज अनंतात विलीन झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! विख्यात धावपटू पानसिंग तोमर यांच्या अमर भूमिकेत त्याला कायम लक्षात ठेवले जाईल…”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment