हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठी सिनेसृष्टीतील चमचमता तारा म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रवींद्र बेर्डे घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. यात गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयायातून घरी सोडण्यात आले होते. परंतु घरी आणल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्यामुळे अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली आहे.
रवींद्र बेर्डे यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांवर एक वेगळी छाप पाडली होती. रवींद्र बेर्डे यांची आणखीन एक ओळख म्हणजे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ होते. या दोन्ही भावांनी अनेक सिनेमांमध्ये सोबत काम केले. परंतु मधल्या काळामध्ये रविंद्र बेर्डे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. घशाच्या कर्करोगावर निदान करण्यासाठी त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी आणले गेले होते. मात्र याच काळात हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रविंद्र बेर्डे यांनी जगाचा निरोप घेतला.
रवींद्र बेर्डे यांचा कार्यकाळ
1965 मध्ये रवींद्र बेर्डे यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. तसेच त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकत 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यामुळे त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीला, बेर्डे कुटूंबला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रवींद्र बेर्डे यांनी आपल्या कार्यकाळात अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे सुधीर जोशी आणि भरत जाधव अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले. त्याचबरोबर त्यांनी आनाडी, खतरनाक, होऊन जाऊ दे, हमाल दे धमाल, चंगू मंगू, थरथराट, उचला रे उचला, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेला, भुताची शाळा, अशा लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले.