ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे आज निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तबस्सुम गोविल यांना शुक्रवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारावेळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीवर शोखकळा पसरली आहे.

तबस्सुम यांनी सर्वप्रथम बाल कलाकार म्हणून चित्रपटात पदार्पण केले होते. तबस्सुम गोविल यांचा जन्म 9 जुलै 1944 रोजी अयोध्येत झाला. त्यांचे वडील अयोध्यानाथ सचदेव आणि असगरी बेगम हे स्वातंत्र्यसैनिक होते. मात्र, अभिनेत्रीचे शिक्षण मुंबईत झाले आहे. 1947 मध्ये मेरा सुहाग या चित्रपटात त्यांनी बालकलाकाराची भूमिका केली होती. त्यांनी अनेक चित्रपटात आणि टीव्ही शोमध्ये सहभागही नोंदवला होता. त्यांचे आज निधन झाले असून २१ नोव्हेंबर रोजी आर्य समाज, लिंक रोड, सांताक्रूझ येथे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

रामायणातील रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांची मेहुणी असलेल्या तबस्सुम गोविल त्यांच्या टॉक शो आणि लहान मुलांच्या भूमिकेसाठी ओळखलया जात होत्या. तबस्सुम या 80 आणि 90 च्या दशकातील एक मोठी स्टार होत्या.

‘टॉक शो’मधून घेतल्या अनेक दिग्गजांच्या मुलाखती

बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या तबस्सुम यांची ओळख फक्त अभिनेत्री म्हणून नव्हती तर त्यांनी दूरदर्शनवरील पहिला टॉक शो ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ तबस्सुम यांनी होस्ट केला होता. ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोला त्यावेळी प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. 1972 ते 1993 अशा दोन दशकाहून अधिक काळ त्यांनी ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ हा शो होस्ट केला होता. या शोमध्ये त्यांनी अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

बेबी तबस्सूम नावाने प्रसिद्ध

सर्व प्रथम तबस्सूम यांनी 1947 साली बेबी तबस्सूम नावाने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तबस्सुम यांनी लहानपणीच सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्या जेव्हा पहिल्यांदा स्क्रीनवर आल्या तेव्हा त्या अवघ्या 3 वर्षांच्या होत्या. ‘मेरा सुहाग’ हा सिनेमा 1947 साली रिलीज झाला. तबस्सुम यांनी या सिनेमात बालकलाकाराची भूमिका साकारली होती. तसेच तबस्सुम यांनी ‘दीदार’ सिनेमात नरगिस यांच्या लहाणपणीची भूमिका केली होती. यामुळे त्यांनी चाहत्यांची मनं जिंकली. दरम्यान यानंतर त्यांनी अनेक चित्रपटही केले.