हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकनाट्य गाजवणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९० व्या वर्षी राजा मयेकर यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात नेल. मात्र डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केलं. राजा मयेकर यांनी थोडी थोडकी नाही तर ६० वर्षे अभिनय क्षेत्र गाजवलं.
त्यांच्या विनोदाची पातळी घसरु न देता केलेल्या अभिनयाची आठवण आजही काढली जाते. वयाच्या १५ व्या वर्षापासून राजा मयेकर यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. दूरदर्शनवरची गप्पागोष्टी ही त्यांची मालिका चांगलीच गाजली. नाटक, चित्रपट, टीव्ही, मालिका आणि आकाशवाणी या चारही क्षेत्रांमध्ये राजा मयेकर यांनी काम केलं आहे.
दशावतारी नाटकांपासून राजा मयेकर यांनी त्यांचा अभिनय प्रवास सुरु केला होता. लोकनाट्याद्वारे त्यांनी व्यावसायिक रंगभूमी जवळून पाहिली. संगीत नाटकेही त्यांनी केली होती. ‘आंधळं दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’, ‘असुनी खास घरचा मालक’ ही त्यांची तीन लोकनाट्य खूप गाजली. तसंच ‘बापाचा बाप’, ‘नशीब फुटकं सांधून घ्या’, ‘कोयना स्वयंवर’ या नाटकांनाही खास प्रसिद्धी मिळाली. शाहीर साबळे यांच्यामुळे ते अभिनय क्षेत्रात आले. त्यामुळे आपल्या कारकिर्दीबाबत बोलताना ते कायम शाहीर साबळेंचा उल्लेख करत.