अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
अमरावती जिल्यातील सर्वात मोठा तालुका असलेला मेळघाट परिसर.याच परिसरातील डोंगराळ परिसरात 50 हुन अधिक गावात भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी पायपीठ हे रोजचंच काम. परिसरातील विहिरी कोरड्या पडलेल्या. या मेळघाटात 30 हुन अधिक टँकर ने पाणीपुरवठा करण्यात येतो. तरी देखील मेळघाटची तहान भागत नाही. गावात पाण्याचा टँकर येतो त्यावेळी अशी ही पाण्यासाठी झुंबळ होते. काही गावात पाण्याचा टँकर विहिरीमध्ये पाणी सोडतो.
सर्वत्र पावसाची वाट असतांना मृग नक्षत्रात देखील पाऊस न आल्याने जिल्यातील धरणात 13 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.त्यामुळे येत्या काळात पाण्याची भटकंती होणार आहे. मेळघाट परिसरातील मोथा गावात देखील पाण्याचा दुष्काळ असतांना गावातील विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेली मनीषा धांडे या चिमुकली विहिरीतून पाणी ओढत असताना तिचा तोल गेला आणि विहिरीत पडली, यात तिला गंभीर दुखापत झाली. प्रथोमचार झाल्यानंतरही ती मृत्यूशी झुंज देत होती.
मानिषाची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयातुन तिला नागपूर येथे पाठविण्यात आले. 10 दिवस मृत्यूशी झुंज देत काल मानिशाची प्राणज्योत मावळली. ही बाब वाऱ्यासारखी सोशल मिडीयावर आल्याने तिला शासकीय खर्चाने मूळ मोथा गावी आणण्यात आले.मात्र पाण्याच्या दुष्काळाने 15 वर्षीय चिमुकलीला मुकावे लागले. 15 वर्षीय चिमुकलीचा बळी गेल्यानंतर आता मात्र जिल्यातील दुष्काळ पाहता प्रशासन कसल्या पद्धतीने नियोजन करून गावातील पाण्याची वणवण थांबवत हे आता महत्वाचे ठरणार आहे