मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या विरोधात महायुती चांगलाच तगडा उमेदवार देण्याच्या विचारात आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष पराभूत केल्यानंतर भाजपला आता राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष पराभूत करण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांच्या विरोधात भाजप, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील आमदार असलेल्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून सदाभाऊ खोत उमेदवारी करण्यास इच्छुक असून त्यांनी या जागेची मागणी देखील भाजपकडे केली आहे. भाजप देखील त्यांना या ठिकाणी लढवण्यास अनुकूल असल्याचे बोलले जाते आहे. राजकारणाचे हे समीकरण जर अस्तित्वात आले तर जयंत पाटील यांच्यासाठी हि धोक्याची घंटाठरू शकते. जयंत पाटील यांची या मतदारसंघावर एक हाती पकड असली तरी सदाभाऊ खोत यांची उमेदवारी प्रभावी ठरू शकते. त्यामुळे नेमके कोण जिंकणार हे सांगता येत नाही.
इस्लामपूरचे निशिकांत पाटील हे देखील या जागेसाठी इच्छुक उमेदवार आहेत. मात्र सदाभाऊ खोत यांना भाजपच्या चिन्हावर उमेदवारी मिळाल्यावर निशिकांत पाटील माघार घेतील असे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्याच प्रमाणे पाच वर्षात भाजपने या मतदार संघात खूपच चांगली बांधणी केल्यामुळे भाजपला या ठिकाणी चांगलाच फायदा होणार आहे. याच मतदारसंघातील वजनदार नेते वैभव शिंदे यांची भाजपने महामंडळावर संचालक म्हणून नेमणूक देखील केली आहे. त्याच प्रमाणे मतदानावर प्रभाव पाडणाऱ्या आणि नेहमी राष्ट्रवादीच्या विरोधाचा अजेंडा राभवणाऱ्या नायकवडी कुटुंबालादेखील भाजपने जवळ केले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांची विधानसभेची वाट थोडी बिकटच असणार आहे.