पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला भुजबळांची दांडी ; राजकीय चर्चाना पुन्हा उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक प्रतिनिधी |  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे घोंगावते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. हे पाहता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. आता संकटात सापडलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार हे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत.

शरद पवार यांच्या दौऱ्याला आज (सोमवार) नाशिकमधुन सुरूवात झाली आहे. एकीकडे पक्षाचे अध्यक्ष नाशिकमध्ये दाखल झाले असताना, दुसरीकडे मात्र राष्ट्रावीदीचे नेते छगन भुजबळ यांची पवारांच्या बैठकीस अनुपस्थिती आहे. छगन भुजबळ हे मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पवारांच्या नाशिक दौऱ्यापेक्षा जास्त भुजबळांच्या अनुपस्थितीमुळे उलट -सुलट चर्चा रंगल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ राष्ट्रवादाली सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या . मात्र भुजबळांनी आपण राष्ट्रवादीत असल्याचे स्पष्ट केल्याने या चर्चांना पुर्णविराम मिळाला होता. छगन भुजबळ हे काँग्रेस -राष्ट्रवादीच्या जागा वाटप संदर्भातील बैठकीसाठी मुंबईत असल्याची माहिती समोर येत आहे. तर त्यांचे प्रतिनिधी म्हणून समीर भुजबळ हे शरद पवारांच्या बैठकीस उपस्थित आहेत. मात्र, तरी देखील छगन भुजबळांची पवारांच्या दौऱ्यादरम्यानची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. याअगोदरही खासदार सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर असतानाही भुजबळांची त्यावेळी असेलेली अनुपस्थितीमुळे चर्चा रंगल्या होत्या.