हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| यावेळची लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) बारामती मतदारसंघात चांगलीच घासून होणार असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे शरद पवार यांनी बारामती मतदारसंघातून (Baramati) महाविकास आघाडीच्या वतीने सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार बारामतीतून उभ्या राहणाऱ्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र अशा परिस्थितीमध्येच शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यासह शरद पवार (Sharad Pawar) यांना दिलेल्या खुल्या आव्हानामुळे बारामतीचे राजकारण आणखीन पेटले आहे.
बारामतीत शिवतारेंचा दौरा
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी बारामती मतदारसंघावर कोणाचा सातबारा नसल्याचे वक्तव्य केले होते. त्याचबरोबर सध्याच्या घडीला बारामतीमध्ये तब्बल 5 लाख 80 हजार मतदार पवारांविरोधात असल्याचा दावाही केला होता. शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता या सर्व घडामोडी घडत असताना विजय शिवतारे उद्या बारामतीसह इंदापूर आणि पुरंदर तालुक्यामध्ये दौरा करणार आहेत. सासवडमध्ये महत्त्वाची बैठक पार पडल्यानंतर ते जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतील. यानंतर मोरगावमध्ये मोरेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर ते बारामतीत पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी जातील.
मुख्य म्हणजे, बारामतीत येऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते बारामतीत कामकाजाचा आढावा घेतील. तसेच बारामतीच्या जवळील गावांमध्ये आपला दौरा ही करतील. पुढे संध्याकाळच्या वेळी ते नरसिंगपूरमध्ये देवदर्शनासाठी जातील. यानंतर इंदापूर शहरातील पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी घेऊन पुन्हा ते माघारी फिरतील. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या काळामध्येच शिवतारे बारामती दौरा करत असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यात बारामती मतदारसंघासाठी पवार कुटुंब सामने-सामने आल्यामुळे आणि यात शिवतारे यांनी एन्ट्री मारल्यामुळे याचा फटका पवार कुटुंबाला बसेल का असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.