अहमदनगर प्रतिनिधी | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे आता या वैराचा पुढील अध्याय म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील यांना संगमनेर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी पाहिजे आहे. सध्या हा मतदारसंघ युतीत शिवसेनेकडे आहे. पण तो भाजपसाठी सोडवून घेण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील या अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत. त्यांना संगमनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी पाहिजे आहे. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात असल्याने तो मतदारसंघ शिवसेनेकडून सोडवून घेण्यासाठी भाजपला बराच खटाटोप करावा लागणार आहे. तसेच शिवसेनेकडे देखील या मतदारसंघात उमेदवारी देण्यासाठी तगडा उमेदवार नाही. त्यामुळे शिवसेना हा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी अनुकूल राहील असे बोलले जाते आहे.
ज्यांनी ज्यांनी मला या निवडणुकीत त्रास दिला त्यांचा हिशोब विधानसभेच्या निवडणुकीत करायचा आहे. त्रास सहन करायला मी काय राधाकृष्ण विखे पाटील नाही असे विधान सुजय विखे पाटील यांनी लोकसभा निवडणूक जिंकल्यावर केले होते. या विधानाला धरूनच त्यांची आपल्या मातोश्रींना संगमनेरमधून विधानसभेच्या निवडणुकीला उभा करण्याचा इरादा केला असावा. एकंदरच विखे थोरात यांच्यातील राजकीय हाड वैर पुन्हा एकदा नव्या रूपात समोर येणार आहे असे दिसते आहे.