सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात अनेक जणांकडून गौरवास्पद कामगिरी केली गेली आहे. त्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. आता अजून एक गौरवास्पद अशी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी कामगिरी हि जावळी तालुक्यातील सुपुत्र व ठाणे ग्रामीण येथे पोलिस अधीक्षक पदावर काम करत असलेले विक्रम नंदकुमार देशमाने यांनी केल्याबद्दल त्यांचा नुकताच राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मान करण्यात आला आहे.
मुंबई येथील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पोलिस अधीक्षक विक्रम नंदकुमार देशमाने यांना नुकतेच पदक देऊन सन्मानित करण्यात आले. जावळी तालुक्यातील सायगाव येथील सुपुत्र विक्रम नंदकुमार देशमाने यांनी आपल्या आजपर्यंतच्या सेवा काळात नाशिक, पुणे, मुंबई झोन11, इस्लामपुर अशा ठिकाणी उत्तम सेवा बजावली आहे. खून, दरोडे, घरफोडी सारख्या अनेक गुन्हयांचा तपास करताना त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती. अत्यंत गंभीर प्रसंगी मोठ्या हिमतीने त्यांनी अनेक ठिकाणी परिस्थिति हाताळली होती. त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना नुकताच राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. देशमाने यांची राष्ट्रपती पोलिस पदकासाठी निवड झाल्याबद्दल सायगावचे माजी सरपंच अजित आपटे, विजयानंद साखरे, सुभाष मेरुलिंगकर, जयसिंग देशमुख, नंदकुमार कदम, पृथ्वीराज कदम, रवी ससाने, अशोक सावंत, दशरथ ससाने, संतोष कदम, अभिजीत दुदुस्कर, प्रकाश जगताप, जयवंत कदम, अनिल जगताप, वैभव ससाने यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.