सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहर पोलिसांना एसटी स्टँड परिसरामध्ये एक 22 वर्षीय तरुण पिस्टल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. बसस्थानक परिसरात पोलिसांनी सापळा लावला होता. यावेळी शहर पोलिसांना पारंगे चौक ते पोवई नाका मार्गावर एक संशयित जात असल्याचे आढळून आले. संशयिताची पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे 1 लाख रुपये किमतीचे गावठी पिस्टल, 50 हजार रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 120 रुपये रोख रक्कम मिळून आली. संशयित आरोपीचे सुरज मुन्ना शेख (वय- 22, रा. भुईंज, ता. वाई) असे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा पोलिस ठाण्याचे हवालदार श्री. यादव यांना एक युवक सातारा एसटी स्टॅंन्ड परिसरात पिस्टल घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी सापळा लावला होता. तेव्हा एक युवक संशयितरित्या फिरताना आढळून आला. त्यास पोलिसांनी हटकले असता तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि रिवाल्वर हस्तगत करण्यात आले.
या युवकाला बेकायदेशीर विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी ताब्यात घेत त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शहर पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दिली आहे. या युवकांसोबत शस्त्र पुरविण्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत तपासासाठी न्यायालयाकडे पोलिस कोठडी मागण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.