हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच बीडमध्ये एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. या कॉल रेकॉर्डिंग मधील संभाषणानुसार 3 ऑगस्टला मुंबईला जात असताना शिक्रापूरपासून दोन किमीपर्यंत दोन गाड्या पाठलाग करत होत्या, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, विनायक मेटे यांच्या अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? अपघातानंतर झालेल्या घटनांची चौकशी करण्यात यावी, अशी महत्वाची मागणी त्यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी केली आहे.
विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “व्हायरल होत असलेली क्लिप मी आत्ताच ऐकलेली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. त्यांनी असे सांगितले आहार की, समोरच्या गाडीवर आपली गाडी नेऊन आदळावी, अशा पद्धतीने ती गाडी ओव्हरटेक करत होती. ही बाब निश्चितच आक्षेपार्ह्य होती. त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे.
तीन ऑगस्टला असाच प्रकार घडला होता.त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे. मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे. अपघातातील गाडी आणि तीन तारखेची गाडी यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे.”, अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे.
अण्णासाहेब मायकर काय म्हणाले ?
विनायक मेटे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ‘3 ऑगस्टला मी साहेबांसोबत होतो, शिक्रापूर येथे 2.5 किमी आमच्यापुढे आयशर गाडी होती. तेव्हा एक चार चाकी गाडीही होती, त्यामध्ये दोन ते चारजण होते. त्या गाडीने आम्हाला दोन वेळा कट मारला. गाडी पुढे घेण्यासाठी आम्हाला हात करत होते. त्यावेळी साहेब म्हणाले, गाडी आयशर मागेच असूद्यात आपल्याला मीटिंगला उशिर झाला आहे. तेव्हा आम्ही बीडहून मुंबईला निघालो होतो. याबाबत दुसऱ्या दिवशी भाचा आकाश जाधव याच्याशी चर्चा केली, ते मायकर यांनी सांगितले.