नांदेड प्रतिनिधी। राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये दिलेला सल्ला चांगलाच चर्चिला जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा गड समजल्या जाणाऱ्या नांदेडमध्ये त्यांचा दारुण पराभव झाला होता. याच गोष्टीची आठवण करून देत तावडेंनी अशोक चव्हाण यांना मित्रत्वाच्या नात्याने सल्ला दिला.आज मंगळवारी मंत्री विनोद तावडे नांदेड दौऱ्यावर आले असता नांदेड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते.
विनोद तावडे म्हणाले की, ‘ही विधानसभा निवडणूक लोकसभेचा रिप्लेच आहे. तसेच गेल्या लोकससभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे चांगलेच तोंडावर आपटले आहेत त्यामुळे चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये.’ ज्या पद्धतीने गेल्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात विकास काम झाली आहेत त्यावरून भाजप महायुतीवाला निवडून देणार आहेत. चव्हाण माझे मित्र आहेत तेव्हा त्यांनी विधानसभा निवडणूक लढाऊ नये, झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवावी’ असा खोचक सल्ला तावडे यांनी चव्हाण यांना दिला आहे. मंगळवारी नांदेड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते.
विनोद तावडे यांच्या या सव्वा लाखाच्या सल्ल्याला अशोक चव्हाण काय प्रतिउत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र तावडे यांनी अशोक चव्हाण यांच्या नांदेड मधील राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून एका नव्या वादाला तोंड फोडले आहे.