हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विनोद तावडे (Vinod Tawde) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. तावडेंचा महाराष्ट्राच्या राजकारणातील हस्तक्षेप वाढत चाललाय. दिल्लीत बसून तावडे फडणवीसांचे (Devendra Fadnavis) पंख छाटण्याचा कार्यक्रम करतायत. महाराष्ट्राचं राजकारण कळणाऱ्या अनेक राजकीय विश्लेषकांची ही खासगीतली मतं. गेल्या काही दिवसांतला भाजपच्या गोटातील घटनांचा सिक्वेन्स बघितला तर फडणवीसांचा राज्याच्या राजकारणावरचा होल्ड कमी होऊन विनोद तावडेंचा डॉमिनन्स वाढल्याचे अनेक पुरावे देता येतील. फडणवीसांसारख्या चाणक्याची उचल बांगडी करून तावडेंना मुख्यमंत्रीपद देण्यामागे अनेकांचे हात असतील यात शंका नाहीच, पण त्यासोबत तावडे मुख्यमंत्री झाल्यावर भाजपच्या एका मोठ्या राजकारणाची सुरुवात होऊ शकते. भाजपची पुन्हा एकदा सत्ता आली तर तावडे मुख्यमंत्री होतील, हे आम्ही इतक्या आत्मविश्वासाने कसं सांगतोय? फडणवीसांचं महाराष्ट्रातील नेतृत्व भाजपला नकोसं वाटायला का लागलंय? भाजपच्या इंटरनल पॉलिटिक्स मधली ही ए टू झेड स्टोरी समजून घेऊयात.
2019 ला आदित्यला मुख्यमंत्री बनवून मी दिल्लीला जाईल, असा शब्द देवेंद फडणवीस यांनी मला दिला होता… भर लोकसभेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी केलेल्या या स्टेटमेंटनं अनेक चर्चांना तोंड फुटलं. त्यातली पहिली म्हणजे खरंच महाराष्ट्राच्या राजकारणात रमलेल्या फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाण्याची स्वप्न पाहत होते का? आणि असं असेल तर त्याचं कारण काय? याच दोन प्रश्नांची नीट फोड केली. तर याचं उत्तर अगदी क्लियर कट देता येतं ते म्हणजे विनोद तावडे. एकेकाळी फडणवीस म्हणतील तीच पूर्व दिशा असं म्हणत राजकारण करणाऱ्या तावडेंना पक्षातून साईडलाईन करण्यात आलं. फडणवीस समर्थक नेत्यांना बळ दिलं जाऊ लागलं. यामुळे झालं काय तर पक्षात अनेक नाराज नेत्यांची एक फळी तयार झाली. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे हे त्यांपैकीच एक त्रिकूट.
पंकजाताई, नाथाभाऊ यांची राजकारणातील नाराजी – धुसपूस ही काही लपून राहिलेली नाही. याच घुसमटीतून नाथाभाऊंनी तर राष्ट्रवादीत काही काळ जाऊन पुन्हा घर वापसी केली. पण या सगळ्यात विनोद तावडे नेमकं काय करत होते? हा प्रश्न अनेकांना पडला होता. तावडेंचं राजकारण संपल्याच्या अनेक बातम्याही पेरल्या गेल्या. पण नंतर हळूहळू चित्र क्लिअर होऊ लागलं. खरंतर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी 2014 लाच फडणवीसांबरोबर तावडेही स्पर्धेत होते. पण फडणवीसांची लॉटरी लागली. आणि यानंतर मात्र महाराष्ट्रात ‘सब कुछ देवेंद्र’ अशी परिस्थिती निर्माण झाली. तावडे बॅकफुटला पडले. यानंतर मात्र तावडे दिल्लीच्या राजकाणात ॲक्टिव्ह झाले. शांतीत क्रांती करत तावडे पक्षातील सर्वात महत्त्वाच्या महामंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचले. शांत, संयमी राजकारणाची चुणूक दाखवत तावडेंनी अनेक राज्यांच्या निवडणुकांत किंगमेकरची भूमिका बजावली. आणि यानंतर सुरू झाल्या तावडेंच्या महाराष्ट्रातील रिलॉन्चिंग चर्चा… फडणवीसांना मागे टाकत तावडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले. पण या सगळ्याला आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनाही रीलेवेंट होत्या… सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे यांना लोकसभेचे तिकीट देऊन दिल्लीत पाठवण्याचं काम सुरू झालं, नाराज खडसेंची मनधरणी करून त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आलं… या सगळ्याच्या मागे विनोद तावडे होते, असं अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. महाराष्ट्रात सुरू झालेला हा तावडेंचा हस्तक्षेप मुख्यमंत्रीपदासाठीच आहे की काय, असाही काहीसा अँगल या घटनांमुळे जोडला जाऊ लागला…
पण तावडेंना मुख्यमंत्री करण्याची काही ठोस कारणं आपल्याला सांगता येतात. त्यातलं पहिलं म्हणजे मराठा कार्ड…
2014 ला महाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून अल्पसंख्यांक ब्राह्मण असलेल्या देवेंद्र फडणीसांना संधी देण्यात आली. महाराष्ट्रानं स्वातंत्र्यानंतर अनेक दशकं मराठा समाजाचा मुख्यमंत्री पाहिला. हे मराठाकेंद्री राजकारण मात्र भाजपनं दूर करत फडणवीसांना संधी दिली. यानंतर भाजपात अनेक मराठा नेत्यांची ताकद कमी केली जाऊ लागली. 2024 उजाडताना भाजप मराठा नेतृत्वावर विश्वास टाकत नाही, असं काहीसं परसेप्शन तयार होऊ लागलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप विरोधात कधीही समाजाचा स्फोट होईल, याची कल्पना येऊ लागली. म्हणूनच विनोद तावडेंना मुख्यमंत्री करून मराठा नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याची संधी भाजपाला पुन्हा एकदा मिळू शकते. तावडे शांत, संयमी आणि सुसंस्कृत राजकारणासाठी ओळखले जातात. ही त्यांची क्लीन इमेज पाहता मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांना जनता सहजपणे एक्सेप्ट करेल, अशी काहीशी यामागची खेळी असू शकते.
तावडे मुख्यमंत्री होतील असं म्हणायला बळ मिळतं त्याचं दुसरं कारण म्हणजे ओबीसी आणि अल्पसंख्यांक नेत्यांचं केलं जात असलेलं पुनर्वसन
भाजपला ओबीसींचा पक्ष म्हणून एक आगळी वेगळी ओळख आहे. पक्षातील नेत्यांपासून ती कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांमध्येही ओबीसी फॅक्टर निर्णायक असल्याचं बघायला मिळतं. माळी, धनगर, वंजारी असा जातींचा गट असलेला माधव पॅटर्न हा राजकीय फॉर्मुला वापरून भाजपने राज्याच्या राजकारणात आपले पाय घट्ट रोवले. मात्र या सगळ्यात मराठा समाजाला काही प्रमाणात नकळतपणे डावलण्यात आलं. मात्र आता मराठ्यांच्या प्रस्थापित राजकारणाची व्होट बँक आपल्याकडे खेचून आणण्यासाठी पक्षात मराठा नेतृत्व उभ करायला भाजप पाहतोय की काय, अशी काही चिन्ह दिसायला लागली. त्याची सुरुवात झालीये ती ओबीसी नेत्यांना दिल्लीत पाठवून. सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे या पक्षातील सर्वात मोठ्या ओबीसी नेत्यांना राज्याच्या राजकारणातून दिल्लीत घेऊन जाण्यासाठी प्लॅन तयार झालाय. फडणवीसही येत्या काळात दिल्लीत जातील अशी चर्चा आहे. एकूणच काय तर राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून मराठा नेता दिसू शकतो, असा मेसेजच अप्रत्यक्षपणे मराठा समाजाला या सगळ्यातून दिला जातोय. पण हे करताना ओबीसी आणि अल्पसंख्यांक नेते नाराज होणार नाहीत याचीही काळजी घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय. तावडेंचा दिल्ली टू मुंबई प्रवास आणखीन सुखकर व्हावा, याचीच कदाचित ही सुरुवात असू शकते…
विनोद तावडे मुख्यमंत्री होतील असं ठामपणाने सांगता येतं त्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे फडणवीसांची ढासळलेली इमेज
2014 पासून मुख्यमंत्री पद सांभाळत फडणवीसांच्या राजकारणाला स्टेट लेवलवर मान्यता मिळाली. फडणीसांनी अनेक राजकीय फासे टाकत आपली पक्षातील ताकद वाढवत नेली. आपल्या संभाव्य राजकीय प्रतिस्पर्ध्यांना बाजूला करत आपल्या कंट्रोल मध्ये असणाऱ्या नेत्यांना बळ दिलं. यामुळे झालं काय तर दिसत नसला तरी फडणवीसांच्या नेतृत्वाला पक्षांतर्गत विरोध वाढू लागला. दुसरीकडे सत्तेचा गणित जुळवून आणण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडण्यात फडणवीसच फ्रंटला असल्याने त्यांची पब्लिक मध्ये एक निगेटिव्ह इमेज तयार होऊ लागली. पण सध्या परिस्थिती अशी निर्माण झाली की फडणवीस नसतील तर भाजपचे राज्यातील नेतृत्व करण्यासाठी एकही चेहरा आजूबाजूला पाहायला मिळत नाही. कारण फडणवीसांनी अगदी सिस्टिमॅटिक पद्धतीने पक्षाचं राजकारण आपल्या हातात घेतलंय. फडणवीसांबद्धल असणारा नाराजीचा फटका महाराष्ट्रातील पक्षाच्या सध्याच्या स्टेटसला बसू नये, म्हणूनच खांदेपालट होऊन नव्या चेहऱ्याची पक्षाला गरज आहे. अशा वेळेस दिल्लीच्या तालमीत तयार झालेले विनोद तावडे हे बेस्ट पर्याय ठरतील…
आता येऊयात शेवटच्या मुद्याकडे तो म्हणजे तावडेंचे दिल्लीश्वरांशी असणारे संबंध
फडणवीस आणि अमित शहा यांचे संबंध चांगले नसल्याची चर्चा अनेकदा होत असते. फडणवीसांच्या राजकीय महत्त्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठीच दिल्लीतून त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर जावं लागलं. थोडक्यात काय तर फडणवीस आणि भाजप हायकमांडचा काही प्रमाणात होईना, छत्तीसचा आकडा आहे. याउलट विनोद तावडे दिल्लीत गेल्यापासूनच नेतृत्व देईल ती जबाबदारी कुठलीही उरफोड न करता प्रामाणिकपणे करत असतात. जे. पी. नड्डा, अमित शहा यांच्यासोबतचे तावडेंचे संबंधही मैत्रीपूर्ण असल्याचं पाहायला मिळतं. 2020 ला राष्ट्रीय सचिव झाल्यानंतर 2021 मध्ये वर्षभरातच त्यांना पक्षाने सरचिटणीस म्हणून बढती देण्यात आली. तसंच त्यांना हरियाणाचे प्रभारी म्हणूनही जबाबदारी दिली गेली. नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचं संयोजनही त्यांनी काही काळ पाहिलं. संघटनात्मक जबाबदारी दिल्यानंतरही त्यांनी दिल्लीत त्यांना सोपवलेली कामं तडीस नेली. राज्यात पुन्हा कुठेही अंतर्गत गटबाजी किंवा हालचाली न करता त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमवला….
फडणवीसांपेक्षा पक्षातील सीनियर लीडर, मराठा राजकारणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिल्लीतील हायकमांड सोबत ट्युनिंग जुळवून असलेल्या तावडेंचे म्हणूनच मुख्यमंत्री होण्याचे चान्सेस सर्वाधिक आहेत… बाकी फडणवीसांचा पत्ता कट करून त्याजागी तावडेंना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली तर यावर तुमचं काय मत असेल? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.