नवी दिल्ली । अनुभवी फलंदाज विराट कोहलीने टी -20 विश्वचषकानंतर या फॉरमॅट मधील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पुढील महिन्यात युएई आणि ओमान मध्ये होणाऱ्या टी -20 विश्वचषक स्पर्धेत तो संघाचे नेतृत्व करेल. दरम्यान, महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेले सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या पुढील कर्णधार आणि उपकर्णधारांसाठी नावे सुचवली आहेत. त्यांनी म्हटले आहे की,” भारताला पुढच्या वर्षी देखील टी -20 विश्वचषक खेळायचा आहे, त्यामुळे कोणीही कर्णधार बदलण्याचा विचार करू नये.”
स्टार स्पोर्ट्सच्या शो ‘क्रिकेट कनेक्टेड’ मध्ये गावस्कर म्हणाले, “मला वाटतं रोहित शर्माला पुढील दोन टी -20 विश्वचषकांसाठी भारताचा कर्णधार बनवावा. आपण असे म्हणू शकता की, ते (विश्वचषक) एका वर्षाच्या आत होणार आहेत. सध्या टी -20 विश्वचषक एक महिन्यामध्ये यूएई आणि ओमानमध्ये सुरू होईल आणि त्यानंतर आता दुसरा टी -20 विश्वचषक येईल. स्पष्टपणे सांगायचे तर तुम्हाला या दरम्यान आणखी कर्णधार बदलण्याची गरज नाही. भारतीय कर्णधारपदासाठी रोहित शर्मा नक्कीच माझी निवड असेल.”
ते पुढे म्हणाले,”त्यानंतर, मी उपकर्णधारपदासाठी केएल राहुलकडे पाहत आहे. मी ऋषभ पंतच्या नावाचाही विचार करेन कारण तो ज्या प्रकारे स्टार खेळाडूंनी भरलेल्या दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे ते खरोखर प्रभावी आहे. एनरिक नॉर्खिया आणि कागिसो रबाडा सारख्या खेळाडूंचा आणखी चांगला वापर करून तो टी 20 फॉरमॅटमध्ये गोलंदाजी बदलत आहे. हे खरोखर एक हुशार कर्णधारपणाचे लक्षण दर्शविते. आपल्याला नेहमीच एक असा कर्णधार हवा असतो जो परिस्थिती पाहू शकतो आणि त्यावर त्वरित एक्शन घेऊ शकतो. तर होय, राहुल आणि पंत या दोघांकडे मी उपकर्णधार म्हणून पाहतो.”
अनेक दिग्गज रोहित शर्माचे नाव सुचवत आहेत कारण तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. या 34 वर्षीय खेळाडूने मुंबई इंडियन्स (MI) साठी 5 आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत, जी लीगच्या इतिहासातील कोणत्याही कर्णधारापेक्षा सर्वाधिक आहे. दुसरीकडे, भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) साठी आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकू शकलेला नाही.