संजय काकांकडून घराणेशाहीचा आरोप म्हणजे विनोद- विशाल पाटील

संग्रहित छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

‘लोकसभा निवडणुका होवून पाच महिने होत आले असले तरी खा. संजयकाका पाटील हे निवडणुकीमधून बाहेर आलेले नाहीत. तासगाव व कवठेमहांकाळ येथे बोलताना त्यांनी आमच्यावर घराणेशाहीचा आरोप केला. जे स्वत:च्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मागतात, ज्यांचे संपूर्ण राजकारण घराणेशाहीवर अवलंबून आहे, अनेक घराण्यांनी त्यांना मदत केलेली आहे असे असताना त्यांच्याकडून आमच्यावर होणारा आरोप हा मोठा विनोद आहे’. अशी खिल्ली युवा नेते विशाल पाटील यांनी उडवली आहे. कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष म्हणून खोऱ्याच्या पाण्याचे पुरात काय नियोजन केले तर खासदार म्हणून केंद्राकडे कोणत्या मदतीची मागणी केली असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

विशाल पाटील पुढे म्हणाले, वसंतदादा घराण्यात जन्माला आलो ही भाग्याची गोष्ट आहे. ज्या घरात जन्मलो तोच वारसा सांगतो आहे. संजयकाका देखील एका घराण्यातूनच आलेले आहेत. आताही स्वत: खासदार असताना पत्नीला आमदार करण्याची त्यांची इच्छा आहे.

माजी मंत्री अजितराव घोरपडेंना आमदारकीला मदत करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. त्याचवेळी आपण घोरपडे यांना पूर्वसूचना दिली होती. आता तो प्रत्यय त्यांना येत आहे. खंजीर खुपसण्याची त्यांची प्रवृत्ती आम्हाला अनेक लोकसभांमध्ये दिसली होती. आता तो अनुभव घोरपडेंना येत आहे. पण संजयकाकांनी आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करणे म्हणजे विनोद समजला पाहिजे. भाजपने जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून राष्ट्रभक्तीचे दिशाभूल करणारे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याचा भांडाफोड प्रचारादरम्यान करू. जिल्ह्याच्या सर्व मतदारसंघात प्रचार करणार आहोत, अशीही माहिती यावेळी विशाल पाटील यांनी दिली.