सांगली । प्रतिनिधी
जिल्ह्यात दादा-बापू वाद पेटवून दोन्ही घराण्यांना सत्तेच्या बाहेर काढले व स्वत: सत्तेत शिरले. त्यामुळे आता पाडापाडीचे राजकारण बंद करणे काळाची गरज आहे. जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीचे पालकतत्व आहे. त्यांनीच माझ्या उमेदवारीचे नाव घेतले. त्यामुळे त्यांनी माझे पालकतत्व स्वीकारून आशीर्वाद देतील व दादांचा नातू खासदार होईल, असा विश्वास कॉंग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत व्यक्त केला.
महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक येथील राष्ट्रवादी कार्यालयात पार पडली. या बैठकीला उमेदवार विशाल पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, युवकचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, मनपातील गटनेते मैनुद्दीन बागवान, पंचायत समिती सदस्य अशोक मोहिते, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आदी उपस्थित होते.
दादा-बापू वाद पिढीजात सुरू आहे. सांगलीची जागा स्वाभिमानीला जाण्यामागे जयंत पाटीलच असतील, अशी खदखद मनात होती. त्यामुळे झारीतील शुक्राचार्य असे मी म्हणालो. पण जाऊदे, ज्यावेळी शेतकरी संघटनेचा उमेदवार निश्चित करण्याची वेळ आली होती. त्यावेळी माझ्या नावाची शिफारस राजू शेट्टी यांच्याकडे जयंत पाटील यांनी केली होती. त्यामुळे मी स्वाभिमानीकडून मैदानात उतरलो आहे. जयंत पाटील यांच्या आशीर्वादाने वसंतदादांचा नातू आता खासदार होणार आहे. त्यामुळे दादा-बापू वाद आता कायमस्वरूपी संपणार नसल्याचे विशाल पाटील यांनी बैठकीत सांगितले.