हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत 3 मे पर्यंत अल्टीमेंटम दिल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोधी पक्ष भाजपने देखील पाठिंबा देत राज्यातील ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र महाराष्ट्रात भाजप सत्तेत असताना त्यांनी भोंगे का हटवले नाहीत असा सवाल आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
काही दिवसांपासून महाराष्ट्रात भोंगे काढण्याची मोहीम सुरु झाली आहे. मात्र भोंग्याचा विषय हा आजचा नसून अनेक वर्षांपासूनचा आहे. महाराष्ट्रात जेव्हा भाजप सरकार होते तेव्हाही भोंगे होते मात्र तेव्हा भोंगे का हटवले नाहीत असा सवाल प्रवीण तोगडिया यांनी केला. आताही ज्या राज्यात भाजपचं सरकार आहे, त्या राज्यात भोंगे का हटवले जात नाहीत.
राज्यात दुसऱ्या कोणाचं तरी सरकार आल्यानंतर तुम्ही भोंगे हटवण्याची मागणी करत असाल तर चांगली गोष्ट आहे,’ असा टोला लगावत भाजप नेत्यांनी भोंगे उतरवण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केंद्र सरकारकडे करावी म्हणजे हा प्रश्न कायमचा संपून जाईल, असंही तोगडिया यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारने विनापरवाना भोंगा लावणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. भोंग्यांबाबतच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. त्यानुसार, धार्मिक स्थळांवर विनापरवानगी भोंगे लावले गेले तसेच निश्चित करून दिलेली आवाजाची (डेसिबल) मर्यादा ओलांडली गेली तर राज्यात कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.