सांगली प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या निवडणुकीत कश्मिरमधील कलम ३७० चा उल्लेख भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. राज्यातील वाढती महागाई, रोजगार, भ्रष्टाचार, बंद पडलेले उद्योगधंदे या विषयावर एक शब्द उच्चारला जात नाही. केवळ जनतेची दिशाभूल करून भावनिक मुद्द्यांना हात घातला जात आहे. जनतेने भाजपचे आता कारस्थान ओळखावे व सांगली पुन्हा कॉंग्रेसच्या विचाराची करण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.विश्वजीत कदम यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ कर्नाळ येथे सभा पार पडली. या सभेत विश्वजीत कदम बोलत होते.
यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, ‘राज्यातील भाजप सरकारला जनता वैतागली आहे. अनेक आश्वासने दिली मात्र ती पूर्ण झाली नाहीत. नव्याने निवडणुकीला सामोरे जाताना कश्मिरमधील कलम ३७० रद्द केल्याचा मुद्दा प्रचारात उपस्थित केला जात आहे.महागाई प्रचंड वाढली आहे. भ्रष्टाचाराचा कळस झाला आहे. जीएसटी, नोटबंदीसह अनेक शासनाच्या जाचक धोरणामुळे व्यापारपेठ अडचणीत आली आहे. कामगार कपात होत आहेत. बेरोजगारांची संख्या वाढत आहे. अर्थव्यवस्था बिकट होत आहे. मात्र जनतेच्या प्रश्नांवर भाजपचे नेते बोलणार आहेत की नाहीत? असा सवाल त्यांनी सरकारला यावेळी विचारला.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले, जाहीर देखील केले पण कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. फक्त भाषणबाजी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक उभारले जाणार आहे. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिलच्या जागेवर स्मारक होणार आहे. मात्र या भाजपच्या मंडळींनी अद्याप कामाला सुरूवात केली नाही. केवळ लोकांची दिशाभूल करून भावनिक मुद्द्यांना हात घातला जात असल्याचा आरोप विश्वजित कदम यांनी केला.