विश्वजित कदम- विशाल पाटील यांची भूमिका काय? पत्रकार परिषदेत थेटच सांगितलं

vishwajit kadam vishal patil
vishwajit kadam vishal patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेची जागा (Sangli Lok Sabha Election 2024) शिवसेना ठाकरे गटाला गेल्यानंतर विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती. विशाल पाटील हे सांगली लोकसभेसाठी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार होते, मात्र आता ते काय करणार? कोणता मोठा निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष्य लागलं होते. अखेर आज पत्रकार परिषद घेऊन विश्वजित कदम (Vishwajit Kadam) आणि विशाल पाटील (Vishal Patil) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीने सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करावा असं आवाहन विश्वजित कदम यांनी केलं आहे.

विश्वजित कदम म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा सुरु असल्यापासून आम्ही सांगलीच्या जागेसाठी आग्रही होतो. सांगलीमध्ये काँग्रेस लढण्यास सक्षम आहे, सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाची मोठी ताकद आहे. आमच्या भावना आम्ही महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील पक्षश्रेष्टींकडे वारंवार मांडली. मात्र उद्धव ठाकरेंनी २१ मार्चला अचानकपणे चंद्रहार पाटील याना उमेदवारी जाहीर केली. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. ज्या परिस्थितीत आज ते संघर्ष करत आहेत त्याबद्दल सुद्धा आम्हाला आदर आहे. परंतु सांगली जिल्ह्याचा जो इतिहास आहे आणि सांगलीच्या जनतेचा, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या ज्या काही भावना आहे त्या लक्षात घेऊन महाविकास आघाडीने निर्णय घेतला असता तर जी परिस्थिती मागील १५ दिवसात निर्माण झाली आहे ती झाली नसती असं विश्वजित कदम म्हणाले.

आज सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून मी महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनंती करतो कि, सांगली जिल्ह्याची राजकीय वस्तुस्थिती आणि परिस्थिती लक्षात घेऊन, सांगलीची सत्य परिस्थिती काय आहे याची पुन्हा एकदा पारख करावी, माहिती घ्यावी आणि जर या निर्णयाचा फेरविचार करता येत असेल तर फेरविचार करावा. हि माझी व्यक्तीगत भावना नाही तर सांगलीच्या काँग्रेस कार्यकर्त्याची भावना आहे असेही विश्वजित कदम यांनी म्हंटल. भाजपने देशामध्ये अनेक चुकीच्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे सांगलीमध्ये भाजपविरोधात लोक नाराज आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठीच महाविकास आघाडी एकत्र आली आहे. आम्ही महाविकास आघाडीसोबतच आहोत मात्र महाविकास आघाडीने सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करावा असं आवाहन विश्वजित कदम यांनी केलं. तसेच आम्ही एकमेकांना धीर देऊन सकारात्मक मार्ग काढू असं म्हणत बंडखोरीची शक्यता फेटाळली आहे.