हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं दुःखद निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणजोत मालवली. विश्वनाथ महाडेश्वर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्र्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनाने ठाकरे गटावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विश्वनाथ महाडेश्वर हे 2017 ते 2019 या काळात मुंबई महापालिकेचे महापौर होते. ठाकरेंचे एकनिष्ठ सैनिक अशी त्यांची ओळख होती. 2002 मध्ये विश्वनाथ महाडेश्वर सर्वप्रथम मुंबई महापालिकेच्या नगरसेवकपदी निवडून आले. 2003 बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर 2017 ते 2019 या काळात त्यांनी मुंबईचे महापौर पद भूषविले.
दरम्यान, आज दुपारी 2 वाजता त्यांचे पार्थिव राजे संभाजी विद्यालय, सांताक्रूझ(पूर्व) येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता विश्वनाथ महाडेश्वर यांची अंत्ययात्रा निघेल. यावेळी ठाकरे गटाचे दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहतील.