“विटा पालिकेत 26-0 झाल्याशिवाय राहणार नाही”- वैभव पाटील

सांगली प्रतिनिधी । माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि मनमंदिर उद्योग समूहाचे संस्थापक अशोकराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण विटा पालिकेत सक्षमपणे काम करतोय. यावेळच्या विटा नगरपालिकेच्या निवडणूकीत 26-0 झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच तुमच्या पायाखालची वाळू घसरली आहे.

तुम्हाला निवडणूकीत पराभव दिसू लागला आहे. त्यामुळेच मतदारांवर आक्षेप नोंदविण्याचे काम केले आहे, अशी घणाघाती टीका विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यावर नाव न घेता केली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, उपनगराध्यक्ष सुभाष भिंगारदेवे, अ‍ॅड. धर्मेश पाटील, नगरसेवक अ‍ॅड. विजय जाधव, फिरोज तांबोळी, मंगेश हजारे, संजय तारळेकर, प्रताप सुतार, विनोद पाटील यांची उपस्थिती होती.

मतदारयादी पुर्नरिक्षण कार्यक्रमात विट्यातील सुमारे 1 हजार 800 मतदारांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. त्यावरील सुनावणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर जोरदार तोफ डागली. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील म्हणाले, राजकारणात निवडून येण्यासाठी मतदारांना वेठीस धरून कोण निवडणूक करत नाही. मतदारांचे मत परिवर्तन करायला लागते. त्यांच्या मनामध्ये जागा निर्माण करावी लागते.