वाधवान कुटुंबियांना लॉकडाऊनमध्ये प्रवासासाठी शिफारस पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा पदावर रुजू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबीयांना खंडाळा ते महाबळेश्वर प्रवास करण्यासाठी शिफारस पत्र दिल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता पुन्हा आपल्या पदावर रुजू झाले आहेत. एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे आंतरजिल्हा प्रवासास बंदी होती. मात्र, पोलिसांनी अडवल्यानंतर अमिताभ गुप्ता यांचे शिफारस पत्र दाखवत वाधवान यांनी कुटुंबातील २३ जणांस खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास केला होता. ही बाब समोर आल्यानंतर राज्यात एकच मोठी खळबळ उडाली होती.

राज्यात विरोधकांनी यावरुन महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. अखेर राज्य सरकारने अमिताभ गुप्ता यांना १० एप्रिलला सक्तीच्या रजेवर पाठवले होते. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासनही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. दरम्यान चौकशी समितीने अमिताभ गुप्ता यांना निर्दोष ठरवले. त्यामुळे त्यांना पुन्हा प्रधान सचिव पदावर रुजू करुन घेण्यात आल्याचे समजते.

अमिताभ गुप्ता गृहविभागाच्या प्रधान सचिव पदावर पुन्हा रुजू झाल्याने भाजपकडून यावर आक्षेप घेण्यात आला आहे. अमिताभ गुप्ता यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती होणे म्हणजे वाधवान बंधुंना सरकार किंवा सरकार चालवणाऱ्यांकडूनच पास देण्यात आला होता, हे स्पष्ट होते. हे आघाडी सरकार आहे का वाधवान सरकार? या प्रकरणाची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”