सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
खटाव तालुक्यातील वडी येथील वडी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुक प्रक्रिया बिनविरोधपणे पार पडली. निवडणूक प्रक्रिया सुरु असतानाच अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तेरा जागेसाठी बारा अर्ज आल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली.
खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाणारी वडी गावची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुक वर्षभरापुर्वी पार पडली होती. यामध्ये बिनविरोधचे भांडवल करुन “ओठात एक न् पोटात एक” या नीतीने आमदार गटाच्या काही हितचिंतकांनी दुटप्पी राजकारण करून गावाच्या एकीला काळे फासले.
अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी वडी गावचे जेष्ठ नेते जाधव शेठ, विठ्ठल येवले शेठ व पुणे येथील कल्याणी स्टीलचे व्हाईस चेअरमन संजय येवले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी चेअरमन संदिप येवले, संतोष येवले, पोपट येवले, फिरोज मुलाणी, माजी सरपंच सुदर्शन मिठारे, विठ्ठल नांगरे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले. अखेरच्या क्षणापर्यंत आमदार गटाचे अर्ज न आल्यामुळे हि निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष आवळे यांनी घोषित केले.
बिनविरोध निवडूण आलेल्या संचालकांमध्ये सर्वसाधारण गटातून युवानेते अभिजीत किसन येवले, विजय बाळासो जाधव, राहूल दिनकर येवले, गणेश विष्णू येवले, पांडुरंग गंगाराम येवले, विठ्ठल बाबूराव येवले, संभाजी बळवंत येवले, विश्वास गणपती येवले सर्वसाधारण महिला गटातून चतुरा पांडुरंग येवले, छबूताई दिनकर येवले इतर मागास प्रवर्गातून अब्दुल हासीम मुलाणी व अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून नथूराम मोतीराम अडसुळे या बारा जणांचा समावेश आहे.
भटक्या विमुक्त जागेसाठी अर्ज न आल्यामुळे सदरची जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री संतोष आवळे यांनी काम पाहीले. त्यांना सोसायटीचे सचिव सचिन पवार यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, सोसायटी निवडणुक बिनविरोध झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढली.