सातारा | सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाचे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी संकेतस्थळ दि. 14 डिसेंबर 2021 पासुन शासनामार्फत सुरु करण्यात आलेले आहे. याबाबत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांस संकेतस्थळाव्दारे तसेच समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय पात्र विद्यार्थ्यांचे सदर संकेतस्थळावरुन अर्ज भरुन मंजुरीस्तव सादर करणेबाबत वेळोवेळी कळविण्यात आलेले आहे. याबाबत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने शासनाकडुन तब्बल 11 वेळा मुदतवाढ देण्यात आलेली आहे व सद्यस्थितीत अंतिम मुदत हि 31 मे 2022 पर्यंत देण्यात आलेली आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरलेले अर्ज महाविद्यालयांचे स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. सन 2021-22 हे शैक्षणिक वर्ष संपलेले असताना देखील महाविद्यालय / महाविद्यालय प्रशासनाकडुन मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत, हि बाब गंभीर स्वरुपाची आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना दिनांक 30 मे 2022 पुर्वी महाविद्यालयामध्ये प्रवेशित असणा-या पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन माध्यमातुन पडताळणी करुन अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा यांच्याकडे मंजुरीसाठी वर्ग करावे. ही बाब मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी संबंधीत असल्याने यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
याबाबत कोणत्याही प्रकारे टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा होऊन पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासुन वंचित राहिल्यास संबंधीत महाविद्यालय व महाविद्यालय प्रशासन यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच प्रचलित शासन निर्णयानुसार व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 (सुधारित नियम 2015 नुसार) गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येईल. असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे यांनी कळविले आहे.