वाशीम । वृद्धपकाळात जन्मदात्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना यापुढे वेतनातील ३० टक्के रक्कम आईवडिलांच्या बँक खात्यात जमा करावी लागणार, असा निर्णय वाशीम जिल्हा परिषदेने घेतला आहे. अशा स्वरुपाचा निर्णय घेणारी वाशीम ही विदर्भातील एकमेव जिल्हा परिषद असल्याचा दावा केला जात आहे.
आईवडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील ३०टक्के रक्कम आईवडिलांना देण्यात यावी. असा ठराव वाशीम पंचायत समितीच्या सभापती रेश्मा गायकवाड यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडला. हा ठराव टाळ्याच्या गजरात एकमतानं मंजूर होऊन तशा आशयाचा निर्णयही जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे.
‘आपला सांभाळ करीत नाहीत, अशा आशयाची तक्रार आईवडिलांनी जिल्हा परिषदेंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात केल्यास त्याची अगोदर पडताळणी करण्यात येईल. आईवडील आणि मुलाचे नाते हे भावनिक असते. त्यामुळे सर्वप्रथम कर्मचाऱ्याला आईवडिलास संभाळावे याबाबत सक्त ताकीद देण्यात येईल. त्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्याने टाळाटाळ केल्यास त्याच्या वेतनातून ३० टक्के रक्कम कपात करीत ही रक्कम आईवडिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल,’ अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली. सदर वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.