सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीत गढूळ आणि काळपट रंगाचे पाणी आल्याने जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणी उपसा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजना काही काळ पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आज सातारा शहराचा पूर्वेचा भाग आणि उपनगरांमध्ये पाणीपुरवठा केला जाणार नाही. सातारकर नागरिकांनी पाणी गाळून आणि उकळून प्यावे, असे आवाहन जीवन प्राधिकरणचे अभियंता महादेव जंगम यांनी केलं आहे.
सातारा शहराला आणि परिसराला बुधवारी जोरदार पावसाने झोपून काढले. सुमारे एक तास पडलेल्या मुसळधार पावसाने सातारा शहरातील सर्व रस्त्यांवर पाण्याची लोट वाहत होते.
साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियम मैदानाच्या गटाराचे पाणी ओव्हरफ्लो झाल्याने गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिरले होते. भाजी आणि फिरत्या विक्रेत्यांसह कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली.
शाहू स्टेडियम मधील व्यावसायिकांच्या गाळ्यात पावसाचे पाणी आणि गटाराचे पाणी शिरल्याने गाळे धारकांचे नुकसान झाले असून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले. जोरदार कोसळलेल्या सरींमुळे सातारा शहरातील रस्त्यांवर पाण्याची लोट वाहत होते. सखल भागात आणि मैदानामध्ये पावसाचे पाणी भरल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. खरीपातील पिकांसाठी अद्याप पाण्याची गरज असल्याने हा पाऊस दिलासादायक ठरला आहे. पूर्वेकडील दुष्काळी पट्ट्यात पावसाने प्रमाण अत्यल्प असल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. त्यामुळे येथील बळीराजाचे डोळे पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे लागले आहेत.