टीम, HELLO महाराष्ट्र । आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं आणि देश सोडून जाऊ नये या दोन अटींवर त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत नेहमी सत्याचाच विजय झाला असल्याचे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘भाजपा’चे नेते नितीन गडकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
”आम्ही कधीही सूडबुद्धीने वागलो नाही. मात्र काँग्रेस सरकारच्या काळात जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते, तेव्हा माझ्याविरोधात, नरेंद्र मोदी ,अमित शहा यांच्यावर देखील चुकीचे खटले दाखल केले होते. नंतर आम्हा सर्वांची निर्दोष मुक्तता झाली. सध्या चिंदबरम यांचे प्रकरण न्यायालयात आहे, त्या ठिकाणीच यावर निर्णय होईल’ असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.