हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची महाविकास आघाडी आहे तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाची युती आहे. अशा वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सोबत जाणार कि शिंदे फडणवीसांच्या युतीला पाठिंबा देणार असा प्रश्न माजी खासदार राजू शेट्टी याना विचारला असता त्यांनी आपण एकट्याच्या बळावर निवडणुका लढवणार आहे असं म्हणत आपली राजकीय वाटचाल स्पष्ट केली आहे.
कराड येथील पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, आता मी सगळे प्रयोग सोडून दिले आहेत. येणाऱ्या काळात मला कोणत्याही आघाडीत जायचे नाही. मी आता फक्त शेतकरी एके शेतकरी असाच राहणार आहे. त्यामुळे आता मलाबाकी काही नको. परंतु याचा अर्थ असा नाही की मी काही राजकीय संन्यास घेतलाय . पण येणाऱ्या निवडणुका मी एकट्याच्या बळावर लढवणार आहे आणि शेतकरी म्हणूनच मी मते मागणार आहे असं राजू शेट्टी यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केलं. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं आम्ही स्वागतच केलं आहे. फक्त राहुल गांधीच नव्हे तर देशातील कोणत्याही नेत्याने अशा प्रकारच्या पदयात्रा काढल्या पाहिजेत. मी सुद्धा अनेक पदयात्रा काढल्या आहेत. पदयात्रेमुळे तळागाळातील लोकांशी थेट संपर्क होतो. लोकांचे जनजीवन समजत, त्यामुळे मोदींनीही जर जग फिरून झालं असेल तर देश पाहण्यासाठी ३ महिन्यांची पदयात्रा काढावी असा खोचक सल्ला त्यांनी दिला. ऊस आंदोलनातून मला मोकळीक मिळाली तर कदाचित मी सुद्धा भारत जोडो यात्रेत जाईन. पण महाराष्ट्रातच गेलं पाहिजे असं नाही. मध्यप्रदेशात पण जाऊन मी या यात्रेत सहभागी होऊ शकतो आणि त्यांना शुभेच्छा देऊ शकतो असं राजू शेट्टी यांनी म्हंटल.