…. तर आम्ही प्रकाश आंबेडकरांना विजयी करू; ठाकरे गटातील आमदाराचं मोठं वक्तव्य

ambedkar thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये युती करण्यात आलेल्या शिवसेना (Shivsena) आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाचा देखील समावेश आहे. आगामी निवडणूकांवर लक्ष केंद्रित करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, वंचित आघाडी संघटन बांधणीसाठी मैदानात उतरली आहे. यातच आगामी निवडणुकीत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनाच विजयी करू असे ठाम वक्तव्य ठाकरे गटातील आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केले आहे.

नितीन देशमुख आगामी निवडणुकांविषयी बोलताना म्हणाले कि,  “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोला लोकसभा आणि जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेतला. यावेळी अनेक विषयावर चर्चा झाली. भाजपला पराभूत करायचे असेल तर ही जागा नक्कीच शिवसेनेला मिळावी असे मत आम्ही मांडले. गेल्या अनेक वर्षांपासून अकोल्यात काँग्रेस चा पराभव होत आहे त्यामुळे ही जागा आपल्याकडे असावी.  त्याचबरोबर, “यावेळी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आपल्यासोबत आहेच. पण, त्यांनी केवळ लोकसभेपुरते राहू नये. विधानसभेला आपल्यासोबत सोबत राहायला हवे. अकोला लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी. जर शिवसेनेला ही जागा मिळणार नसेल आणि येथून वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर लढणार असतील तर आम्ही त्यांना देखील विजयी करू. मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजपला ही जागा जिंकू देणार नाही” अशी भूमिका देशमुख यांनी मांडली आहे.

प्रकाश आंबेडकरांची अकोल्यातून लढण्याची इच्छा

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होईल का नाही याबाबत वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र सध्या तरी ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती कायम आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना आणि आघाडी सोबत लढताना दिसतील. मुख्य म्हणजे, गेल्या निवडणुकांमध्ये आघाडीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जोरदार फटका बसला होता. आता देखील प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ठाकरे गट त्यांना पाठिंबा देण्याविषयी काय भूमिका घेईल हे लवकरच कळेल.

दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून संजय राऊत हे मुंबईतील ईशान्य मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात आहे. जर संजय राऊत या मतदारसंघातून उभे राहिले तर त्यांची पहिलीच लोकसभा निवडणूक असेल. सध्या आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून राष्ट्रवादीने देखील जोरदार हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी राज्यात झालेल्या घडामोडीनंतर या निवडणुकीत राजकीय समीकरणे पलटू शकतात.