हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनामुळे राज्यात बिकट स्थिती असून दररोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे ग्रामीण भागातील नागरिक, शेतकऱ्यांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण आहे. काहीजण स्वत:सह आपल्या जनावरांचीही काळजी घेताना दिसत आहेत. जिल्ह्यातील एका गावात चक्क जनावरांना मास्क घालण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. शिवाय जनावरांना बांधताना देखील सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन केले जाते आणि जनावरांच्या गोठ्यात सॅनिटाईझरची फवारणीदेखील केली जात आहे.
सध्या नांदेड जिल्हा कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. या जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील दत्त मांजरी येथील गावकऱ्यांनी कोरोनाला हरवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील आता कोरोना पसरला आहे. माहूर तालुक्यातील दत्त मांजरी हे गाव आदिवासीबहुल आहे. येथील गावकरी कमी शिकलेले आहेत. पण, गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सुरुवातीपासूनच गावकरी विशेष खबरदारी घेत आहेत.
या गावात शेती आणि मोलमजुरी करून गावकरी आपला उदरनिर्वाह करतात. गेल्या मार्च महिन्यात कोरोनामुळे देशात टाळेबंदी लागली होती. तेव्हा येथील गावकऱ्यांना कोरोनाची इतकी भीती नव्हती. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र नांदेड जिल्हा कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनला आहे. शहरात तर कोरोनाने कहर केला आहे. गाव खेड्यापर्यंत यंदा कोरोना पसरला. दत्त मांजरी या गावची लोकसंख्या 1500 इतकी आहे. यावर्षी मार्चमध्ये गावात दहा जणांना कोरोनाची लागण झाली. उपचारानंतर सगळेजण बरे झाले, पण गावकऱ्यांमध्ये कोरोनाची भीती निर्माण झाली. त्यामुळे सरकारी नियमांचे पालन येथे काटेकोरपणे केले जात आहे.
अशातच जनावरांना देखील आजार होत असल्याचे गावकऱ्यांना जाणवले, तेव्हा जनावरांना कोरोना होईल या भीतीने गावकऱ्यांनी जनावरांनाही मास्क घालण्याचा निर्णय घेतला. शेळ्यांना इथे मास्क घातला जातो. गोठ्यात बांधताना शेळ्यांना देखील अंतर ठेवून बांधले जाते. गोठ्यात सॅनिटाईझरची फवारणी देखील केली जाते.