हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि नाव गोठवलं असून अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. त्यानंतर आता नव्या चिन्हासाठी आणि नावासाठी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ३ पर्याय दिल्याच्या चर्चा सुरु आहेत. निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नावे आणि चिन्हाबाबत माहिती देण्याची मुदत दिली आहे.
ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी सुचवलेल्या नावात शिवेसना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही नावे सुचवण्यात आली आहेत अशी चर्चा सुरु आहे तर चिन्हासाठी त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल या चिन्हांचा समावेश असल्याची चर्चा आहे. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत लवकरच निर्णय घ्यावा अशी विनंती शिवसेनेकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे.
दरम्यान, मातोश्रीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची झालेली बैठक पार पडली. जवळपास दीड तास सुरू असलेल्या या बैठकीत उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच काही सुचनाही केल्या आहेत. उद्धव ठाकरे हे सायंकाळी सहा वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.