मुंबई । महाराष्ट्र सरकारने ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढणार असल्याची घोषणा केली. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन अनलॉक २ म्हणजे काय याचा सुस्पष्ट खुलासा करावा अशी मागणी राज्य सरकारला केली आहे. गेल्याच महिन्यात उद्धव ठाकरे यांनी अनलॉक १ ची घोषणा केली होती. त्यानंतर लॉकडाउन हा शब्द आपण मागे ठेवून आता अनलॉक २ चा उच्चार केला. त्यानंतर आता फडणवीस यांनी अनलॉक २ बाबत प्रश्न विचारला आहे.
याशिवाय, ‘अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या राज्य सरकार पूर्णत: संभ्रमावस्थेत आहे. एटीकेटी बाबतचा विचार नाही. परीक्षा झालीच तर मूल्यांकनाची समान पद्धत नाही. संभ्रमावस्थेत न राहता ठोस निर्णय राज्य सरकारने करावा’ असं आवाहनही फडणवीस यांनी राज्य सरकारला ट्विटच्या माध्यमातून केलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत ठाकरे सरकारने अनेक निर्बंध शिथील केले असून अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. ३० जून रोजी लॉकडाउन संपत असून मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा सध्या सुरु आहे. दरम्यान ठाकरे सरकारने लॉकडाउन ३१ जुलैपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली असून ‘मिशन बिगिन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. यामुळे ३० जूननंतर सध्या असणारे निर्बंध कायम असणार आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”