हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकार वर टीकास्त्र सोडलं आहे. राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हे ठाकरे सरकारचं अपयश आहे. तसेच 1500 रुपयांत कोणाचं पोट भरत? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून काय होणार? कोरोनाची परिस्थिती वाढत चालली आहे. त्यावर उपाय योजना कोण करणार? असा सवाल उपस्थित करत भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल केला.
भाजपनेते नारायण राणे यांनी शुक्रवारी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.. यावेळी राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर सडकून टीका केली. ‘राज्यातील सध्याची परिस्थिती गंभीर आहे. गेल्या चार महिन्यांत राज्य १० वर्षे मागे गेले आहे. राज्याला आज मुख्यमंत्रीच नाही. ज्या नेत्याकडे मुख्यमंत्रिपद आहे तो ‘मातोश्री’च्या पिंजऱ्यात बसला आहे. ‘ मातोश्री ‘पुरताच मुख्यमंत्री आहे. एकतर मुख्यमंत्री तिथून बाहेर येत नाहीत आणि बाहेर आलेच तर काही बोलत नाहीत. त्यामुळे हे अबोल, निष्क्रीय सरकार सत्तेत राहणं राज्याच्या हिताचं नाही’
पत्रकार परिषदेस भाजपचे राज्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार नितेश राणे, राज पुरोहित उपस्थित होते. यावेळी बोलताना राणे यांच्या निशाण्यावर प्रामुख्याने मुख्यमंत्री ठाकरे होते. करोना, लॉकडाऊन, पोलिसांच्या बदल्या, पंढरपूरची महापूजा या मुद्द्यांवरून राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. करोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. मुंबईत ५ हजारावर तर राज्यात ८ हजारावर बळी गेले आहेत. ही स्थिती असतानाही सरकार जराही गंभीर नाही. जनतेचे कोणतेही प्रश्न हाताळले जात नाहीत. राज्याच्या मंत्रालयात गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्रीच बसत नाही. सगळा कारभार मातोश्री या निवासस्थानातून चालवला जातो. हे असंच चालणार असेल तर ज्या सचिवालयाचं नाव बदलून मंत्रालय असं केलं होतं ते नाव आता पुन्हा एकदा सचिवालय करावं लागेल, असा टोला राणे यांनी लगावला.
लॉकडाऊनवरून राणे यांनी तोफ डागली. मुख्यमंत्री डोळे मिटून लॉकडाऊन करत सुटले आहेत. मागचापुढचा कोणताही विचार केला जात नाही. लॉकडाऊन करायला हवं पण कुठपर्यंत तेही ठरवायला हवं. लॉकडाऊन वाढत असताना प्रत्येक महिन्यात नवे प्रश्न उभे राहत आहेत. करोनाचे रुग्णही कमी होत नाहीत. लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्योगधंदे बंद पडले आहेत. मुंबईसारख्या शहरात रियल इस्टेटचे व्यवहार ठप्प झाले आहेत. शेतकऱ्याला बोगस बियाणं देऊन फसवलं जात आहे. कोकणात चक्रीवादळ आलं तिथे मदतीचा एक रुपयाही अद्याप मिळालेला नाही. अनेक ठिकाणी अजून पंचनामेही केले गेलेले नाहीत. पगाराचे प्रश्नही आवासून उभे आहेत. होमगार्डचे पगार झालेले नाही. असे एक ना अनेक प्रश्न असून राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर हे सरकार जायला हवं, असे राणे म्हणाले.
राज्य अधिकारी चालवत आहेत. मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर कोणताही अंकुश दिसत नाही. बदल्या परस्पर केल्या जातात. त्या परत रद्द केल्या जातात. अशाप्रकारे राज्य चालू शकत नाही, असे राणे यांनी सांगितले. राष्ट्रपती राजवटीच्या मागणीवर मी ठाम आहे व ते माझे वैयक्तिक मत आहे, असे राणे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. मुंबई पालिकेएवढा भ्रष्टाचार देशात दुसऱ्या कोणत्याच संस्थेत नाही. गेली २५-२६ वर्षे मुंबईत कोणताही विकास झाला नाही. जागतिक कीर्तीचं हे शहर भकास झालं आहे. याला केवळ शिवसेना जबाबदार आहे, असा आरोप राणे यांनी केला.