जिल्ह्याभरात 26 बसेसची चाके फिरली; ‘या’ मार्गांवर सुरु झाली बससेवा

औरंगबाद – महिनाभरापासून सुरु असलेल्या संपात सहभागी झालेल्यांपैकी काल आणखी 55 कर्मचारी रुजू झाल्याने एकूण 530 संपकरी कामावर हजर झाले आहे. त्यामुळे आता औरंगाबाद विभागातील सिल्लोड आगार सुरु झाला असून, या आगारातून फुलंब्रीसाठी दोन बसच्या 4 फेऱ्या करण्यात आल्या. तर वैजापूर आणि गंगापूर आगार मंगळवारीच सुरु झाले होते, मात्र काल दिवसभरात या दोन्ही आगारातून एकही बस चालवण्यात आली नाही. असे असले तरही जिल्हाभरात एकूण 26 बस रस्त्यावर धावल्या.

संपकरी कर्मचारी रुजू झाल्याने मंगळवारी पैठण, गंगापूर आणि वैजापूर आगार सुरू झाले. या आगारांतून 10 बस प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाल्या होत्या. औरंगाबाद आगारातूनही काल दिवसभरात सिल्लोड, कन्नड आणि जालन्यासाठी 14 बस धावल्या होत्या. काल हजर झालेल्या 530 कर्मचाऱ्यांमध्ये 21 चालक आणि 11 वाहकांचा समावेश आहे. उर्वरित कर्मचारी अन्य विभागाचे आहेत.

काल एकूण 26 लालपरी धावल्या. त्यात औरंगाबाद आगार क्र 1 (सिडको बसस्थानक) मधून 7 बसने जालन्यासाठी 14 फेऱ्या केल्या तर आगार क्र. 2 (मध्यवर्ती बस स्थानक) मधून एकही लालपरी धावली नाही. पैठण आगारातून 7 साध्या बस प्रवासी सेवेत आल्या. यामध्ये 4 बस पैठण -औरंगाबाद मार्गावर धावल्या. या 4 बसच्या 8 फेऱ्या झाल्या. पैठण -पाचोड मार्गावर 2 बसने 4 फेऱ्या केल्या. पैठण-शेवगाव मार्गावर 2 तर पैठण -अंबड मार्गावर 1 बस धावली. कन्नड आगारातून कन्नड-औरंगाबाद मार्गावर 2 बसने 12 फेऱ्या केल्या. औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकातून 12 खासगी शिवशाही पुण्यासाठी तर 6 शिवशाही नाशिकला पाठवण्यात आल्या. सर्व बसमधून बुधवारी तब्बल 1 हजार 381 प्रवाशांनी प्रवास केला आहे.