कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली, तेव्हा त्रिसुत्री ठरली होती. यामध्ये पदाचे व मंत्रीपदाचे समसमान वाटप आणि 60 : 20 : 20 अशी निधीची मांडणी ठरली होती. परंतु सातारा जिल्ह्यात निधीबाबत हे सुत्र शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून कुठेही आढळले नाही. राष्ट्रवादी जिथे स्ट्राॅंग आहे, तेथे शिवसेनेवर अन्याय होत आहे. या गोष्टीची माहिती पक्षप्रमुखांच्या कानावर घातल्या जातील, बाकीच्या पक्षांनी यांचा विचार करणे गरजेचे आहे. तेव्हाच महाविकास आघाडी सरकार पुढे जावू शकते असे ठाण्याचे शिवसेनेचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, शिवसेना पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन बानगुडे- पाटील, तालुकाध्यक्ष नितीन काशीद, महेश पाटील, हर्षद कदम, शशिराज करपे, अजित पुरोहित आदी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान सुरू आहे. या अभियानात जिल्हा परिषद निहाय बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून राबविलेल्या योजना लोकाच्यापर्यंत सोबत शिवसेना खेड्यापाड्यात पोहचविण्यासाठी काम सुरू आहे. पक्षसंघटना करण्यासाठी हे अभियान आहे. संघटनेचे काम कशाप्रकारे सुरू आहे, निधीची आवश्यकता कुठे- कुठे यांची माहिती घेतली जात आहे.
धर्मवीर चित्रपटात कुणीही राजकारण आणू नये
निलेश राणे यांनी ट्विटद्वारे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजकीय भाष्य केले होते. त्यावर खा. श्रीकांत शिंदे म्हणाले, धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे साहेब यांनी शिवसेना वाढविली. मुंबईनंतर ठाणे जिल्हा शिवसेनेचा आहे. यामधून धर्मवीराचे विचार लोकांच्यापर्यंत जात आहे. सिनेमातूनही धर्मवीर कशाप्रकारे जगले हे पुढच्या पिढीला शिकवते. याच्यावर कुणी राजकारण करत असेल ते बरोबर नाही. त्यामुळे कुठेही राजकारण आणू नये.