कोण आला रे.. कोण आला… गुवाहाटीचा चोर आला : कुमठेत बाळासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादीत राडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे. अशातच या गावात बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने लढत असून निवडणूकीत चांगलीच रंगत आल्याचे पहायला मिळत आहे. काल बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कोपरा सभा घेण्याच्या मुद्यावरून दोन्ही गटात चांगलाच राडा झाला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी 50 खोके, एकदम अोके आणि कोण आला रे.. कोण आला… गुवाहाटीचा चोर आला अशा घोषणा आ. महेश शिंदे यांच्या विरोधात दिल्या.

कुमठे येथे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे विधानपरिषद आ. शशिकांत शिंदे यांची सत्ता आहे. तालुक्यातील महत्वपूर्ण गावात आपली सत्ता यावी, यासाठी विरोधी आ. महेश शिंदे गटाकडून जोरदार तयारी आहे. त्यामुळे काल कुमठे गावात कोपरा सभा घेण्यासाठी स्वतः आ. महेश शिंदे आले होते. यादरम्यान दोन गटात ग्रामपंचायत कार्यालयासमोर राडा झाला. आता या दुरंगी लढतीत नक्की कोण बाजी मारणार याकडे कोरेगाव तालुक्यासह जिल्ह्यातील बाळासाहेबांची शिवसेना व राष्ट्रवादीच्या समर्थकांचे लक्ष लागून राहिले आहे.

कुमठे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीत 15 सदस्य व 1 लोकनियुक्त सरपंच पद अशी 16 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी एकूण 32 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक पार्श्वभूमीवर दोन गटातील वादाची माहिती कोरेगाव पोलिसांना मिळताच, मोठा पोलिस फाैजफाटा घेवून घटनास्थळी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे आता सत्ताधारी सत्ता राखणार की सत्तांतर होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.