हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर मानेची शस्त्रक्रिया झाली असून त्यांना अजून 2 महिने आराम करावा लागण्याची शक्यता आहे. अशावेळी राज्याचा काळजीवाहू मुख्यमंत्री कोण होणार अशा बातम्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत. तसेच याबाबत अजित पवार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच नाव आघाडीवर आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते रिलायन्स हॉस्पिटलमध्ये फिजिओथेरपीचे उपचार घेत आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज दिल्यानंतरही त्यांना किमान दोन महिने आराम करावा लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा भार कुणाकडे जाणार याबाबतची सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राज्यातील विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यामुळे खरच राज्यात काही काळासाठी मुख्यमंत्री बदलणार का अशी चर्चा रंगली आहे.