औरंगाबाद – छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मागील आठवड्यात क्रांती चौक येथे बसविण्यात आला. या पुतळ्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वी म्हणजेच 19 फेब्रुवारीच्या अगोदर करावे अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. त्यामुळे मनपा प्रशासन आस्तिक कुमार पांडेय यांनी शनिवारी सकाळी पुतळ्याची पाहणी केली. त्यानंतर 9 फेब्रुवारी नंतर अनावरण कार्यक्रम घेण्याचा विचार सुरू आहे.
शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात येणार हे अद्याप निश्चित नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल असे बोलले जात आहे. परंतु शिवरायांच्या वंशजांकडूनच पुतळ्याचे अनावरण करावे अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
अनावरणाचा वाद आणखी चिघळू नये, म्हणून महापालिकाने तातडीने कार्यक्रम घेण्याचा विचार सुरू केला आहे. या ठिकाणी शिवसृष्टीचे काम सुरू असून ते पूर्ण होण्यास बराच कालावधी लागणार आहे.