‘या’ कारणांमुळं अरविंद केजरीवाल पुन्हा दिल्लीच्या गादीवर …(स्पेशल रिपोर्ट)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही तासांतच निकाल जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांवर मतमोजणी सुरु आहे. मतमोजणीचा सुरुवातीचा कल लक्षात घेता आम आदमी पार्टी (आप) पुन्हा एकदा दिल्लीत सरकार स्थापन करणार असं चित्र दिसत आहे. ‘आप’ने सुमारे ५० जागांवर तर भारतीय जनता पक्षाने सुमारे २० जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार सर्व जागांवर पिछाडीवर आहेत.

दिल्लीच्या जनतेनं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मुद्दा विचारात घेत अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास दाखवला आहे. दरम्यान आता, प्रश्न पडतो की आम आदमी पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा बहुमत मिळताना का दिसत आहे? या प्रश्नाचा मागोवा घेताना समोर आलेले काही मुद्दे खालीलप्रमाणे-

चेहरा सर्व काही

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी परिणामांचा कल लक्षात घेता एक गोष्ट स्पष्ट झाली की अरविंद केजरीवाल सध्या दिल्लीतील राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. केजरीवाल यांच्या राजकारणावर आणि नेतृत्वावर दिल्लीकरांचा जास्त विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी विजयी झाल्यास दिल्लीचे नैतृत्व कोणाला मिळणार? या प्रश्नाचे उत्तर भाजपा कधीही देऊ शकले नाही. केवळ सामूहिक नैतृत्वाचा मुद्दा पुढे करत त्यांनी प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला गेला. कदाचित याच मुद्यावर अरविंद केजरीवाल वारंवार भाजपला घेरण्याचा प्रयन्त करत राहिले. दिल्ली निवडणुकांच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की नैत्रुत्वाचा चेहरा नसल्यास मत देखील मिळत नाहीत.

स्थानिक समस्या – वीज, पाणी, शाळा
गेल्या एक वर्षापासून अरविंद केजरीवाल यांच्या नैतृत्वात सरकारच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी आम आदमी पक्षाने नेहमीच स्थानिक प्रश्नांवर जोर दिला आहे. वीज आणि पाणी यांना निवडणुक प्रचाराचा मुद्दा बनविण्यात आला. आम आदमी पक्षाला सुरुवातीपासूनच माहित होते की वीज आणि पाणी यासारख्या मुद्द्यांचा दिल्लीतील प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होतो. अशावेळी त्याचा परिणाम मतांवरही दिसून येईल. या सर्वांच्या दरम्यान त्यांना हे माहित होत कि, दिल्लीतील सरकारी शाळांच्या सुधारणेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शाळांची अवस्था सुधारून आम आदमी पक्षाने आपला हेतू स्पष्ट केला. तो म्हणजे दिल्लीतील प्रत्येक स्तरातील नागरिकांचा आम्ही विचार करतो. जरी तो नागरिक गरीब असेल आणि आपल्या मुलाला शासकीय शाळेत पाठविणारा का न असेल.

विनामूल्य सुविधांचे मूल्य मतात मिळाले
जर जनता सरकारला कर देत असेल तर नागरिकांच्या दैनंदिन सुविधा पुरवणं ही सरकारची मुख्य जबाबदारी आहे. दैनंदिन सुविधा ज्यात वीज, पाणी आणि प्रवास यांचा प्रामुख्यानं समावेश होतो. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने दिल्लीतील नागरिकांना वीज आणि पाणी मोफत पुरवले. त्याच वेळी, डीटीसी बस आणि दिल्ली मेट्रोमध्ये महिलांसाठी प्रवास विनामूल्य केला. या सुविधा विनामूल्य पुरवत दिल्ली सरकारने एक प्रकारे मोठ्या समूहावर प्रभाव पाडला.

मोदींवर ‘चिडीचूप’ बाकींवर हल्ला
अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला करणं टाळलं. नरेंद्र मोदींची लोकप्रियता अजूनही अबाधित असल्याने त्यांच्यावर टीका केल्याने आपल्याला नेहमी फटका बसत आला आहे हा धडा केजरीवाल यांनी स्वतःच्या अनुभवातून घेतला. तसेच मोदीनंतर भारतीय जनता पक्षात असा कोणताही नेता नाही ज्याच्यावर राजकीय हल्ल्या केल्यामुळे नुकसान झाले आहे. ह्या बाबी लक्षात घेत दिल्ली विधानसभा निवडणूक 2020 च्या निवडणूक प्रचारात अरविंद केजरीवाल यांनी मोदी वगळता इतरांवर टीका करण्याची रणनीती अवलंबली. जेव्हा निवडणूक प्रचारादरम्यान पाकिस्तानकडून मोदींवर टीका झाली तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टपणे सांगितले की मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत आणि शेजारच्या देशाला यावर बोलण्याचा अधिकार नाही. दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांनी अमित शहा आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी यांना लक्ष्य केले. त्यानुसार नफा-तोटा पाहून केजरीवाल यांनी निवडणूक प्रचारात भाजपवर राजकीय हल्ले केले.

भाजपने रचले अनेक सापळे रचले ,पण …
आम आदमी पक्षाने भाजपाला फायदा होऊ शकेल अशा विषयांना निवडणूक प्रचारात फाटा दिला. निवडणूक प्रचारादरम्यान भारतीय जनता पक्षाने शाहीन बागेत होणार्‍या धरणे आंदोलनाला मुख्य मुद्दा बनविण्याचा प्रयन्त केला. भाजपने सुरवातीला कालिंदी कुंज रस्ता बंद झाल्यामुळे जनतेला रोज नाहक त्रास होत असल्याचा मुद्दा उचलला होता. मात्र, खरं तर शाहीन बाग आंदोलनाला जातीयवादी रंग देऊन राजकीय फायदा मिळवणे हेच भाजपचे मुख्य उद्दीष्ट होते. या मुद्द्यावर भाजप वारंवार केजरीवाल यांना आपले मत व्यक्त करण्यास भाग पाडत राहिली. मात्र, केजरीवाल यांनी चतुराईने या विषयापासून स्वतःला दूर ठेवले. त्याचबरोबर स्वत: ला हनुमान भक्त म्हणवून भाजपाचे जातीय कार्ड अयशस्वी करण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस आहे तरी कुठे?
दिल्ली विधानसभा निवडणुका २०२० मध्ये आम आदमी पार्टी, भाजपा आणि काँग्रेस असे तीन प्रमुख पक्षांमध्ये मुख्य संघर्ष होता. परंतु निवडणूक प्रचारापासून मतमोजणीपर्यंत ही निवडणूक भाजप आणि ‘आप’ यांच्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यानच्या काळात काँग्रेस कुठेही या निवडणुकीत संघर्षाच्या भूमिकेत नव्हती. काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांनीही आपली मत बदलली. याचा अधिक फायदा आम आदमी पक्षाला झाला. मतदानाच्या टक्केवारीनुसार कोणत्या पक्षाला किती फायदा आणि किती नुकसान झालं हे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईलच. परंतु काँग्रेस निवडणुकांचा भाग असून सुद्धा जमिनीवर काँग्रेसने काम न करणं हे ‘आप’च्या पथ्यावर पडलं. काँग्रेसने जाणीवपूर्वक प्रचारात पिछाडीवर राहत मतांचे विभाजन होऊ नये म्हणून ‘आप’ला अप्रत्यक्ष मदद केली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment