ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची ऑफर फडणवीसांनी का नाकारली?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुलाखालून बरंच पाणी गेलंय. हे ध्यानात आल्यावर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना चक्क मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. फडणवीस जर याला हो म्हणाले असते, तर आज एकनाथ शिंदेंचा पुरता बाजार उठला असता. होय एकनाथ शिंदेंनी बंड करून आमदार जेव्हा सुरत मार्गे गुहावटीला गेले होते. धनुष्यबाण आपल्या हातातून निसटून चाललंय हे जेव्हा ठाकरेंना कळून चुकलं तेव्हा त्यांनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला. पण सगळा खटाटोप सत्तेसाठीच सुरू असताना फडणवीसांनी ही ऑफर नेमकी का नाकारली? पुन्हा एकदा ठाकरेंसोबत जात मुख्यमंत्री होण्यापेक्षा शिंदेंचं प्रमोशन करत त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरच समाधान का मानलं? हेच इन डिटेल समजून घेऊयात…..

जेव्हा शिंदे आणि आम्ही सोबत येत होतो. त्या दिवशी सकाळी मला उद्धवजींचा फोन आला होता. ते मला म्हणाले, तुम्ही कशाला बंडखोरांना सोबत घेताय. शिंदेंना कशाला पद देताय. मी संपूर्ण शिवसेना पक्ष घेऊन येतो. तुम्ही मुख्यमंत्री व्हा… एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मोबाईलवर झालेला हा संवाद… वेळ निघून गेली आहे. या निर्णयाशी वरिष्ठांशी बोला. माझ्या पातळीवर हा निर्णय संपलाय. जे सोबत आलेत त्यांच्याशी बेईमानी करणार नाही…फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेलं हे प्रत्युत्तर…

फडणवीसांचा चान्स हुकला. नाहीतर Eknath Shinde यांचा बाजार उठला असता.

खरंतर शिंदेंनी शिवसेना फोडल्यानंतर मधल्या काळात नेमकं काय घडलं? याच्या डिटेल्स अजून समोर आल्या नव्हत्या. ठाकरेंनी शिवसेना वाचवण्यासाठी खरंच काही प्रयत्न केले का? याबाबतही अनेक शंका होत्या. मात्र आता पक्ष वाचवण्यासाठी ठाकरेंनी आपली मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडून ती देवेंद्र फडणवीसांना देण्याची ऑफर दिली होती. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या मध्येच फडणवीसांनी हा खुलासा केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. याचा अर्थ ठाकरे स्वतः महाविकास आघाडीतून बाहेर पडून पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार होते… शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना वाऱ्यावर सोडून देणार होते… हेच यातून क्लिअर होतं. पण फडणवीस यांनी हा जो काही खटाटोप मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी लावला होता, तीच संधी ठाकरेंच्या ऑफरनं चालून आलेली असताना देखील फडणवीसांनी ती का नाकारली?

तर या गोष्टीची अनेक स्पेसिफिक कारण सांगता येऊ शकतात. त्यातलं पहिलं म्हणजे फडणवीसांचा ठाकरेंवर असणारा वैयक्तिक राग.

2019 ला युतीच्या नावाखाली एकत्र निवडणुका लढवून देखील मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी शरद पवार आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीच्या नावाने बस्तान बांधलं. मोदीजींच्या नावाने मतं मागितली पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत मांडीला मांडी लावून बसले. ठाकरेंच्या या एका खेळीमुळे भाजपचं आणि देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न भंग पावलं होतं. ‘मी पुन्हा येईन’ असं आत्मविश्वासानं सांगणाऱ्या फडणवीस यांचा करेक्ट कार्यक्रम झाला होता. सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा ठेचली गेली होती. त्यामुळे फडणवीस यांचा ठाकरेंवर विशेष राग होता. आपला हाच मनस्ताप फडणवीसांनी बोलूनही दाखवलाय. मी उद्धवजी फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पाच वर्ष ज्या व्यक्तीने स्वत:च्या पक्षासमोर तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला सांभाळलं. किमान तुम्ही फोन उचलून इतकं तरी बोलू शकता. नाही देवेंद्र आमचं काहीतरी वेगळ ठरलं, आम्ही नाही येऊ शकत.पण तुम्ही फोन पर घेणार नसाल, तर त्याला स्वार्थ नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. याचा अर्थ युतीचे दरवाजे त्यांनी बंद केले आहेत…

शरद पवारांनी यानंतर महाविकास आघाडीच्या केलेल्या आगळ्यावेगळ्या खेळीने फडणवीसांना बराच त्रास सहन करावा लागला. त्यांना ट्रोल करण्यात आलं. महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून त्यांना जी ओळख मिळाली होती त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. थोडक्यात आपल्या क्रेडिबिलिटीवरच शंका घेतली जातेय, हे त्यांच्या लक्षात आलं. आणि याची सुरुवात ठाकरेंमुळे झाली. हा सगळा सिक्वेन्स पाहता फडणवीस ठाकरेंवर किती दातओठ खाऊन असतील? याचा आपण अंदाज लावू शकतो. यामुळेच आता ठाकरेंच्या जीवावर नाही तर आपण आपल्या राजकीय डावपेचावर मुख्यमंत्री व्हायचं, हे फिक्स झाल्यामुळे त्यांनी ठाकरेंची ऑफर नाकारली असावी…

दुसरं कारण असू शकतं ते शिंदेंना दिलेला मुख्यमंत्री पदाचा शब्द.

सत्तास्थापनेसाठी, मविआ फोडण्यासाठी भाजपनं शिंदेंना बाजूला केलं. पण शिवसेना पक्ष फोडण्याइतपत रिस्क घेण्याआधी शिंदेंनी भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा शब्द घेतला असावा. हे कन्फर्म असल्यामुळेच शिंदे निर्धास्त होते. ही सगळी स्क्रिप्ट दिल्लीतून लिहिलेली असल्यामुळे फडणवीस यांचाही या सगल्यातला उपमुख्यमंत्रीपदाचा रोल आधीच फिक्स झालेला असावा. थोडक्यात शिंदेंना सोबत घेत शिवसेना फोडण्याचा डाव हा फक्त महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री बसवणं एवढ्या पुरता मर्यादित नसून तो लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींचा विचार करून घेतलेला निर्णय होता. त्यामुळे जरी ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असली, तरी ती तेव्हाच्या राजकारणाला रेलेव्हेंट नव्हती. आमदारांचा जो काही मोठा गट विश्वासाने आपल्याबरोबर आला आहे, त्याला धोका देऊन पुन्हा ठाकरेंसोबत जाणं हे न परवडणारं होतं. मुळात शिवसेनेतील शिंदेंना बाजूला करण्याचा हा अंक 2014 पासूनच सुरु होता. थोडक्यात शिंदेंना सोबत घेऊन मुख्यमंत्री करण्यामागे भाजपच्या डोक्यात काही खास गणित होतं. आता तो सगळा विचार बाजूला सारून ठाकरेंना सोबत घेण्यात काहीच पॉईंट नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरेंची ही ऑफर फडणवीसांनी नाकारली असावी…

तिसऱ्या आणि शेवटच्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो तो म्हणजे ठाकरेंचा लहरीपणा…

ठाकरेंच्या राजकारणाचा विचार केला तर ठाकरे यांच्या राजकीय भूमिकांमध्ये अनेकदा कोलांट्या उड्या पाहायला मिळाल्या. भाजपसोबत कित्येक वर्षांची युती असली तरी ते कधी सत्तेत आले नव्हते. पण जेव्हा 2014 ला सत्ता आली तेव्हा मात्र ठाकरेंची चलबिचल सुरू झाली. सत्तेत असूनही आपल्या मित्र पक्षावर सातत्यानं टीका करणं…तिकीट वाटपाच्या वेळेस आडमुठी भूमिका घेणं…केंद्रातील निर्णयांवर सामनातून ताशेरे ओढणं… हे प्रकार सुरूच होते. त्यामुळे युती असली तरी ती एकदिलाने नाही, हे स्पष्ट होतं. यानंतर अमित शहा आणि ठाकरे यांची 2019 ला बंद दाराआड झालेल्या चर्चेत आपली फसवणूक झाल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाणं… या सगळ्यामुळे ठाकरेंच्या लहरीपणाची भाजपाला जाणीव होती. या सगळ्याचा विचार करता शिंदेंनी पक्ष फोडल्यानंतर ठाकरेंनी दिलेल्या या मुख्यमंत्री पदाच्या ऑफरवर कितपत विश्वास ठेवायचा? असा ट्रस्ट इशूही फडणवीसांसमोर असावा. हे कारणही मुख्यमंत्री पद नाकारण्याला कारणीभूत असू शकतं…

बॉटम लाईन काय तर शिंदेंचं बंड जेव्हा इन प्रोसेस होतं. जेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची देखील मिळाली नव्हती. त्याआधीच ठाकरेंनी फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊन मोठा डाव टाकला होता. जर फडणवीसांनी याला होकार दिला असता तर शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं करिअरच एका झटक्यात संपलं असतं. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जी काही खिचडी पाहायला मिळतेय ती दिसली नसती. असो. पण यातलं काहीच घडलं नाही. आणि जे काही घडलय त्याचे आपण आज साक्षीदार आहोतच. पण यानिमित्ताने राजकारणात नैतिकता, विचारसरणी आणि खरेपणा यांना किती महत्त्व असतं? या प्रश्नाचं कटू उत्तर मिळून जातं…