पणजी । अलीकडेच गोव्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी विधानसभेत याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की,”अंधार झाल्यानंतर आपली मुले रात्री समुद्र किनार्यावर का फिरतात याबद्दल पालकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.”
मुख्यमंत्री प्रमोद सावंत बुधवारी विधानसभेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी केलेल्या त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देत होते. 24 जुलै रोजी दक्षिण गोव्यातील लोकप्रिय कोळवा समुद्रकिनाऱ्यावर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्यावर आमदारांनी गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप केला होता.
सीएम प्रमोद सावंत म्हणाले,”दहा मुले बीचवर पार्टी करण्यासाठी जातात. 10 पैकी 6 घरी परततात. उर्वरित दोन मुले आणि दोन मुली रात्रभर समुद्रकिनार्यावर थांबतात. जेव्हा एक 14 वर्षांची मुलगी समुद्राकाठी रात्र घालवते, तेव्हा पालकांना देखील आत्मपरीक्षण करावे लागेल. त्यांनीही याची काळजी घेतली पाहिजे.”
ते म्हणाले,”ही जबाबदारी आपलीही आहे. कारण मुले त्यांच्या पालकांचे ऐकतच नाहीत, मात्र आपण सर्व जबाबदारी पोलिसांवर ठेवू शकत नाही.” बलात्कारावरील मुख्यमंत्र्यांच्या या विधानाला विरोधकांनी विरोध दर्शविला आहे. माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई म्हणाले की,”गोव्याची अशी ब्रँड इमेज आहे की कोणीही रात्री उशिरापर्यंत सुरक्षितपणे फिरू शकेल.” दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आसिफ हातेली, राजेश माने, गजानंद चिंचणकर आणि नितीन याब्बल अशी त्यांची नावे आहेत.