‘ती’च्या नकाराला सिरीयस न घेता, फालतु रोमँटिकपणा बॉलिवूड का दाखवतं??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

थर्ड अँगल | जिया शहा

तो – माझा पाठलाग करणं सोडा. 
ती – का?
तो – कारण मला आवडत नाही. मी नाही मानत.
ती – बघ काय समस्या आहे?
तो – तुझ्या घरातले? जात? धर्म? मी…
ती – मला आवडत नाही. मला एकटीला सोडा. 
तो – मी तुला आवडत नाही? 
ती – नाही. आता करणार नाही ना माझा पाठलाग? 
तो – नाही. 

तिचा आणि त्याचा संवाद. या संभाषणानंतर असे वाटते की आता काय होईल? ते वेगळ्या मार्गाने जातील? अंहं! तुम्ही कोणत्या जगात राहता? हे बॉलिवूड आहे मित्रांनो, त्याने तिचा पाठलाग केला पाहिजे. आणि पुढे सगळा नरकच. हेच आहे जे तो पुढे जाऊन तो करतो. तो तिच्या घरापर्यंत तिचा पाठलाग करतो.  तिथे उभा राहून तो मोठ्याने ओरडतो. नमस्कार साहेब! कुणी केलं हे? हे नाटक माझ्या घरासमोर करून बघा. माझे आईवडील तुमचे तुकडे करतील. मला समजत नाही की, आमचे चित्रपट सामाजिक चौकटीच्या वास्तवाशी दूरपर्यंत संबंधित नसतात. खूपशा प्रेमकथांमध्ये ते दोघे वास्तविक मुद्द्यांबद्दल कधीच बोलताना दिसत नाहीत. फक्त प्रचंड कष्टाने ते एकमेकांना पाहतात आणि लगेच प्रेमात पडतात (प्रेमगीत सुरु होते.) तुम्ही ज्या माणसाला आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी निवडत आहात त्याला ओळखणं ही तरी साधी मूलभूत गोष्ट असते. एक जोड चप्पल घेतानाही आपण यापेक्षा जास्त विचार करतो. प्रेमाचे हे असले आंधळे प्रयोग, स्फोटकांपेक्षा कमी नाहीत. एकदिवस ते तुम्हाला नक्कीच उडवून टाकतील. ‘दिल से’  हा प्रेमाच्या त्रिकोणाचा मणीरत्नमच्या प्रसिद्ध सिनेमांपैकी एक सिनेमा आहे. मी हा सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक होते.

ए.आर.रहमान आणि गुलजार साहेबांचे खूप आभार आहेत. त्यांच्या गाण्यातील प्रेम आणि आपुलकीच्या भावनेमुळे सिनेमातील प्रेमाची खोली लक्षात येते. मी नुकताच हा सिनेमा पाहिला आणि मला धक्काच बसला. मला धक्का याचा बसला की हा सिनेमा म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतला एक अभिजात प्रेमकथेचा सिनेमा मानला जातो. ज्या सिनेमाने प्रेमाची नवीन तत्वे दिली.  तिगमांशू धुलिया यांचे मन हेलावणारे संवाद, संतोष सिवनचा अप्रतिम कॅमेरा आणि जादुई गाणी असून सुद्धा चित्रपट प्रेमाचा संपूर्ण मुद्दाच चुकवतो. मुलींच्या नकाराला सतत दुर्लक्षित करणं, तिच्या नकाराला कधीच स्वीकारायचं नाही. तिचा नकार म्हणजे तिची लाजून सहमतीच असते. होय, हे सगळं आमचा नायक अमर याने केलं आहे. कारण असे मानले जाते की बॉलिवूड यालाच हिरोची परिभाषा मानतं. मणिरत्नमने ह्याला अत्यंत कुशलतेने रोमँटिक आणि सौन्दर्यपूर्णतेमध्ये दाखवलं की ते आपल्या लक्षातही आलं नाह.

अमरमध्ये एक घाणेरडा व्यक्ती लपलाय, ज्याची महत्वकांक्षा स्त्रीला मिळवणं एवढीच आहे. यामध्ये एक वाळवंटातले दृश्य आहे, ज्यात तो तिच्यावर हिंसकपणे वार करतो आणि तिला शरीरसुख देण्याची जबरदस्ती करतो. ती त्याला ढकलत असते आणि मारत असते. ते टाळून तो तिचे चुंबन घेतो. आणि काही झालेच नाही या अविर्भावात तिथून निघून जातो. ती तिथेच असहायपणे विव्हळत बसते. प्रेक्षक म्हणून ती भूमिका आपण आपल्याशी जोडू पाहतो. मी जेव्हा या दृष्यापर्यंत पोहोचले आणि मेघनाच्या जागी स्वतःला ठेवू पाहिलं, तेव्हा मला माझ्यावरच बलात्कार झाल्यासारखं वाटलं. अशा एखाद्या माणसाकडून सतत पाठलाग होणं हे एखाद्या भयंकर स्वप्नापेक्षा कमी नाही. हे दृश्य मला माझ्या मागे एक माणूस लागला होता त्या सगळ्या वाईट अनुभवांची, भीतीची, अस्वस्थतेची, असहायतेची आठवण करून देते. मला आश्चर्य वाटते, की मणिरत्नमने त्याचे चित्रण प्रेमात विश्वासघात झालेल्या एका निष्पाप मुलासारखे का केले?  मला आश्चर्य वाटते की या स्पष्टीकरणाला त्रास न दाखवता प्रेम दाखवले गेले आहे !! मला चित्रपटात या माणसाचा चेहरा बघणंसुद्धा सहन होत नव्हतं. मी मागच्या वर्षी हा सिनेमा अर्ध्यातून पाहणंच सोडून दिलं. काही दिवसांपूर्वी मी हा सिनेमा पुन्हा पूर्ण बघितला. कारण मला या सिनेमाबद्दल लिहावंसं वाटलं. जेव्हा मेघनाचा भाऊ अमरला मारायला येतो तेव्हा त्याला फक्त एवढेच जाणून घ्यायचे असते की तिचा नवरा यातला नेमका कोण आहे. तिचे लग्न झाले आहे हेच त्याला तिच्या नकाराचे एकमेव कारण  वाटते. तिला त्याच्यात अजिबात रस नाही याची शक्यता सुद्धा त्याला वाटत नाही. 

यावर्षी प्रदर्शित झालेल्या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर ‘छपाक’चं सर्वत्र कौतुक झालं. हा सिनेमा बघून मला भारतीय पुरुषी मानसिकतेचा थेट संबंध लावता आला, की ते नकार स्वीकारू शकत नाहीत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुलगी हवीच असते. तिला हिंसकपणे पकडून किंवा तिच्यावर ऍसिड फेकून आणि याला प्रोत्साहन देतात हे असले काही सिनेमे – ‘दिल से’ आणि ‘कबीर सिंग.’ भारतीय सिनेमा नेहमीच प्रेमाची अशी व्याख्या दाखविते, ‘काहीतरी जे पहिल्या नजरेत होतं’ जे संपूर्णतः बाह्य आणि दृश्य गुणांवर अवलंबून असतं. हे अशीही प्रेरणा देतात की, कोणत्याही मुलीला कितीही टोकापर्यंत बघत राहायचं, आणि बघत राहायचं जोपर्यंत ती होकार देत नाही. तिच्या नकाराला नेहमी होकार समजणे, आणि जर तिने तुम्हाला कानाखाली वाजविण्याचे धाडस केले किंवा तुम्हाला कठोर चेतावणी दिली तर तिच्यावर हिंसा करायची म्हणजे तिला कळेल. आणि काहीच आश्चर्य नाही की, तरुण आजही याला रोमान्ससाठीची अभिजात पद्धत समजतात. ‘दिल से’ ही अभिजात प्रेमकथा मानली जाते.

सिनेमा हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही तर लोकांची मते तयार करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. कोणत्याही नात्यात सहमती ही सर्वात महत्वाची बाब आहे. गँग्स ऑफ वासेपूरमध्ये ज्या पद्धतीने हुमा कुरेशी म्हणते, परमिशन लेनी चाहिए ना? ते खूप अप्रतिम आहे! पण आपल्या हिरोंना सहमतीच्या प्रेमाबद्दल कधी सांगितलेच गेले नाही. ऍसिड हल्लेखोर हा एकटा दोषी नाही. आपल्याला हेही समजले पाहिजे की, समाज त्याला मार्गदर्शन करत असतो. जे अभिनेते तरुणांचे आदर्श असतात, चित्रपट निर्माते जे अशा स्टॉकर प्रेमकथांना मुलामा लावून विकतात. आयटम सॉन्गमध्ये स्त्रीचे शरीर फक्त एक मोहक वस्तू म्हणून दाखविले जाते आणि सेन्सॉर बोर्डसुद्धा कोणत्याच आक्षेपाशिवाय या घातक गोष्टी दाखवते. या सगळ्या गोष्टीही तितक्याच जबाबदार आहेत. त्रास देणं ही साधी कृती नाही, ही गुंतागुंतीची एक मानसिक प्रवृत्ती आहे, जी सामाजिक पैलू आणि घटकांमुळे प्रभावित झाली आहे. त्यामुळेच फक्त त्रास देणारा व्यक्ती नाही तर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टीसुद्धा तितक्याच जबाबदार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. जे आपण सहसा टाळतो किंवा विसरून जातो. हे नेहमीच खूप निराशाजनक आहे. आपण भारतीय प्रेक्षक म्हणून या सगळ्या वाईट गोष्टी घेतो आणि पचवतोसुद्धा. मग ते सामाजिक आरोग्यासाठी कितीही धोकादायक असले तरी. केवळ प्रेक्षक नाही तर चित्रपट निर्मातेसुद्धा अशा शून्य नैतिक मूल्ये असणाऱ्या सिनेमांना देखील उत्कृष्ट कृती म्हणतात. अत्याचाराला तुम्ही जे रोमान्स म्हणून दाखवता, ती काही कला नाही श्रीयुत मणिरत्नम! ही गोष्ट गुन्ह्यांपेक्षा कमी नाही.

अनुवाद – जयश्री देसाई. (9146041816)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

तबलिगी प्रकरण, मुस्लिमांना दोष आणि कायद्याचं खरं रुप – फैझान मुस्तफा

कोरोना विषाणूनंतरचं जग – युवाल नोआ हरारी 

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

दूरदर्शनवर भारत एक खोज अन् संविधान या मालिकादेखील लावाव्यात – पृथ्वीराज चव्हाण