हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रसिद्ध राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांची जवळपास साडे तीन तास बैठक झाली.या बैठकीत काय विषय चर्चिले गेले किंवा कुठल्या मुद्द्यावर खलबतं झाली याविषयी कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण काहीतरी मोठ्या विषयावर चर्चा झाली आहे हे मात्र निश्चित सांगता येऊ शकतं. यानिमित्ताने राजकारणाच्या आखाड्यात बऱ्याच राजकीय चर्चांना उधान आलंय हे निश्चित. काही जुन्या संदर्भांचा मागोवा घेत या बैठकीत नेमकं काय झालं असावं याचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केला.
प्रशांत किशोर हे नाव तसं २०१४ पूर्वी फारसं कुणाच्या परिचयाचं नव्हतं. काही विशिष्ट लोकांना त्या नावाची ओळख होती पण संयुक्त राष्ट्रसंघात काम करणारा एक भारतीय नागरिक एवढीच सीमित ओळख त्या नावाची होती. २०१४ साली नरेंद्र मोदींच्या विजयाच्या चर्चेत सगळ्यात मोलाची भूमिका बजावणारा आणि टीम मोदीचा पडद्यामागचा कलाकार म्हणून प्रशांत किशोर हे सगळ्यांना परिचित झाले. त्यानंतर किशोरांचा वारू चौफेर उधळला गेला आणि भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात पॉलिटिकल इव्हेंट मॅनेजमेंट नावाची संकल्पना रूढ होत गेली. या मागचा एकच हिरो लोकांसमोर आला तो म्हणजे प्रशांत किशोर नावाचा हा माणूस. सध्याच्या काळात “डेटा इज द फ्युएल” असं म्हटलं जातं आणि याच डेटाच्या मदतीने सत्ता सुंदरीपर्यंत जाण्याचा तुमचा राजमार्ग हा माणूस सुकर करून देऊ शकतो याची भारताच्या बड्या राजकारण्यांना भुरळ पडली. बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल सगळीकडे निवडणुकांत या माणसाला भरपूर मागणी येऊ लागली. आपल्या कौशल्याचा वापर करत लोकांना काय हवं आहे, काय नको आहे ते सगळं नेत्यांपर्यंत पोहोचवून अनेकांची राजकीय करियर सेट करण्यात किशोरांचा वाटा मोठा होत गेला.
अगदी हाताबाहेर गेलेली निवडणूक प्रशांत किशोर नावाचा हा माणूस खेचून आणू शकतो. याची अनेक उदाहरणं आहेत पण याचं ताजं उदाहरण आपण पश्चिम बंगाल राज्याचं घेऊया. गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवत सत्तेचा उपभोग घेणाऱ्या ममता बॅनर्जी यांना “अँटी इंकंबसी”चा खूप मोठा तोटा होणार होता तसेच केंद्रातील सत्ताधारी भाजप सत्ता मिळवण्यासाठी कुठ्ल्याही थराला जाऊ शकणार होता. याची सगळी कल्पना असताना सुद्धा ममता पुन्हा सत्तेत येतील आणि भाजप तीन आकडी सदस्य संख्या निवडून आणू शकणार नाही हे सुरवातीपासून फक्त प्रशांत किशोर नावाचा माणूस छातीठोकपणे सांगत होता. सगळी परिस्थिती विपरीत असताना सुद्धा निकाल प्रशांत किशोर यांनी सांगितल्या प्रमाणेच लागले आणि देशाच्या जनमानसाची नस ओळखण्यात ते पुन्हा एकदा यशस्वी झाले. आता या प्रशांत किशोर यांनी गेली पन्नास – बावन्न वर्ष संसदीय राजकारणाचा अनुभव असणाऱ्या आणि राजकारणाचा “चाणक्य” ओळखल्या जाणाऱ्या पवारांसोबत साडे – तीन तास चर्चा झाली तर काय – काय घडू शकतं याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. त्यातूनच काही मुद्दे समोर आले.
१) 2024 लोकसभा निवडणुकीआधी भाजप विरोधात देशात जर आघाडी तयार करायची असेल तर ती कशी असली पाहिजे.त्याच्या तयारीसाठी ही भेट नक्कीच महत्वाची ठरू शकेल.
२) प्रशांत किशोर यांनी याआधी नरेंद्र मोदी, पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग, बिहार मध्ये नितीश कुमार तर २०१९ विधान सभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर काम केलं आहे. त्यामुळे भाजपचे राजकारण, निवडणूक जिंकण्याचे डावपेच याचा प्रशांत किशोर यांचा दांडगा अभ्यास आहे. त्याचा काही फायदा करता येऊ शकतो का ? याची देखील चाचपणी केली गेली असेल.
३)पुढच्या वर्षी देशात महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यात भाजपसाठी सगळ्यात महत्त्वाचं असणारे राज्य म्हणजे उत्तर प्रदेश. फेब्रुवारी महिन्यात उत्तर प्रदेशबरोबर पंजाब,उत्तराखंड, गोवा यासारख्या राज्यांच्या निवडणुका आहेत. या राज्यातही भाजप विरोधात आघाडी करता येऊ शकते का?यावर देखील चर्चा झाली असेल.
पण एकूणच बैठकीचं कारण गुलदस्त्यात आहे म्हणून आपण यावर फक्त अंदाजच बांधू शकतो पण भाजप विरोधात निवडणुकीच्या रणनीतीमध्ये मात देणारा म्हणून प्रशांत किशोर यांचा चेहरा आहे. त्यांनी भाजप विरोधात सरकार स्थापन करण्याचा प्रयोग करणाऱ्या शरद पवार यांची भेट घेतल्यामुळेच राजकीय वर्तुळात ही भेट प्रचंड चर्चेत आली आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.