बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अनैतिक प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यानं आणि अनुकंपा तत्त्वावर मुलाला नोकरी लावण्यासाठी एका महिलेनं प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. याप्रकरणी स्थानिक पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंददेखील करण्यात आली होती. पण घटनेच्या तीन महिन्यानंतर आरोपी महिलेचा गुन्हा उघडकीस आला. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
भीमराव रंगनाथ खराटे असं हत्या झालेल्या 52 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. ते कळंब तालुक्यातील भोगजी येथील रहिवासी होते. मृत खराटे हे एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. दरम्यान 29 मे 2021 रोजी केज तालुक्यातील मांगवडगाव शिवारातील धनराज थोरात यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. मृताची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता. तसेच युसूफवाडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण मृत भीमराव खराटे यांचा भाऊ बालाजी खराटे यांना पत्नी, तिचा प्रियकर आणि मुलावर संशय होता.
याप्रकरणी बालाजी यांनी युसूफवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. पण बालाजी यांनी हार मानली नाही. त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयानं संबंधित आरोपींवर युसूफवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यानंतर पोलिसांनी मृत भीमराव यांची पत्नी राधाबाई भीमराव खराटे,प्रियकर महादेव ऊर्फ बबन अच्युत खराटे व मुलगा सिद्धेश्वर भीमराव खराटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी राधाबाई आणि महादेव यांच्यात मागील काही दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. पती भीमराव हा त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता.