मुंबई । देशात कोरोना रुग्णसंख्या १० लाख ३८ हजारहून अधिक झाली आहे. राज्यातही मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री संचारबंदी वाढवणार का असे प्रश्न उभे राहत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संचारबंदी वाढवण्यासाठी अनुकूल आहेत असे एकूण दिसत आहे. विविध महापालिकांनी त्यांच्या क्षेत्रात संचारबंदी केली आहे. त्याचा हेतू मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणेआणि रुग्णांना उपचारांची सुविधा मिळणे हा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, “संचारबंदी लावून रोगाला अटकाव करण्याची खात्री असेल तर विश्वासाने पण तारतम्याने निर्णय घ्या. कुणाच्याही दडपणाखाली येऊ नका. प्रशासनातल्या सर्व यंत्रणांनी घट्टपणे हातात हात घालून काम केले पाहिजे. सरकारच्या वेळोवेळी सूचना येतात. प्रत्येकाने आपल्या सोयीप्रमाणे अर्थ काढू नये. सरकारने प्रयोगशाळा १३० पर्यंत वाढवल्या आहेत, एन्टीजेनबाबत सूचना दिल्या आहेत. धार्मिक, समाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी कायम ठेवली आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सणवार साजरे करतांना नवे कंटेनमेंट क्षेत्र वाढू नये.”
काही दिवसांपूर्वी धारावीच्या मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले. मुंबईने अत्यंत पारदर्शक पद्धतीने काम केले आहे. कुठलीही माहिती लपविली नाही. हे संकट किती भीषण आहे आणि त्याचा मुकाबला राज्य सरकारने कसा केला हे देखील आपण नागरिकांना विश्वासात घेऊन मोकळेपणाने सांगितले आहे. धारावीसारखा परिणाम आपल्याला राज्यात इतरत्रही दाखवता येऊ शकेल अशी चर्चाही सुरु आहे. दरम्यान जगभरातील रुग्णसंख्या १ कोटी ४२ लाख पार गेली आहे. जगभरात ५१ लाख ३४ हजार ६२३ रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत.