हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या वरून केलेल्या विधानावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांच्या भूमिकेनंतर काही संघटनांनी त्याना धमकी दिल्याची माहिती समोर आली होती. त्यातच राज ठाकरे हे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना केंद्र सरकार कडून विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज ठाकरेंना सध्या राज्य सरकारची वाय प्लस सुरक्षा आहे.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंबंधी 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर त्याविरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असं म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी मनसेला दिला होता. त्यामुळे देखील राज ठाकरे यांच्या सुरक्षेत केंद्र सरकार वाढ करू शकते. तसेच 5 जूनला राज ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. राज ठाकरे अयोध्येला गेल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडूनही त्यांना विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी अयोध्येला मोठा फौजफाटा तैनात राहणार असल्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंची भूमिका काय??
मशिदी वरील भोंगे हटवले नाहीत तर आम्हीही त्याच मशिदीसमोर हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. भोग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. मी कोणत्याही धर्माविरोधात नाही. मला राज्यातील शांतता बिघडावयाची नाही. माणुसकीच्या नात्याने मुस्लिम धर्मियांनी याचा विचार करणे गरजेचे आहे. मात्र, सांगून देखील तुम्ही ऐकणार नसला आणि दिवसभरात पाच वेळा भोंगा लावणार असाल, तर मशिदीसमोर आम्ही देखील पाच वेळा हनुमान चालिसा लावू, अशा इशारा राज ठाकरे यांनी दिली आहे.