हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्या 40 समर्थक आमदारांसह बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेनेतील बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एवढेच नव्हे तर आपला गट म्हणजेच खरी शिवसेना असा दावा एकनाथ शिंदे यांनी केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या एकूण सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
पवारांसोबत चर्चा आणि शिवसेना आक्रमक झाली-
सुरुवातीलाच शिंदेंनी समर्थक आमदारांसह सुरत आणि नंतर गुवाहाटीला गेल्याने उद्धव ठाकरे आणि शिवसेना बॅकफुटवर केलेली पाहायला मिळाली एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे राजीनामा देणार अशीही चर्चा सुरू होती. मात्र त्याच वेळी शरद पवार दिल्लीतून मुंबईत आले आणि संपूर्ण चित्रच पालटले. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. इतक्यात खचून जाऊ नका, परिस्थिती केव्हाही बदलेल अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना आधार दिला.
‘त्या’ बैठकीनंतर बंडखोरांवर कारवाई-
शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भक्कम पाठिंबा पाहून मरगळलेली शिवसेना पुन्हा एकदा पेटून उठल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नाही तर सुरुवातीला भावनिक आवाहन करणाऱ्या आणि शांत संयमी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भाषाही बदलली. शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर शिवसेनेने आपल्या 16 बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई केली.
शरद पवारांना कायदेशीर बाबींची संपूर्ण जाण-
शरद पवार हे मुरलेले राजकारणी आहेत. पवारांनी देशात अनेक सरकारे बनताना आणि पडतानाही बघितली आहेत. शरद पवार यांनीच महाविकास आघाडी सरकार स्थापन करून चमत्कार घडवला होता. तसेच प्रदीर्घ राजकीय अनुभव असल्यामुळे पवारांना कायदेशीर प्रक्रियेबद्दल जाण आहे. याशिवाय सरकारला वाचवण्यासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरल्यामुळे बंडखोर आमदारांनावरही मानसिक दबाव येऊ शकतो.
यापूर्वीही महाविकास आघाडीला सावरले-
2019 ला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत पहाटेचा शपथविधी घेतला तेव्हाही शरद पवारांनीच आपल्या राजकीय रणनिती नुसार परिस्थिती योग्यप्रकारे हाताळली होती. आणि राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा पवार आपला करिश्मा दाखवून महाविकास आघाडी आणि पर्यायाने उद्धव ठाकरेंना तारणार का हे पाहावे लागेल.