औरंगाबाद – सरकारच्या वतीने कोरोना काळात शाळा, महाविद्यालये, खासगी कोचिंग क्क्लासेस बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. परंतु अद्यापही ती सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे गेल्या दीड वर्षांपासून संचालक व शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही उपासमारी थांबविण्यासाठी आजपासून शहरातील खासगी कोचिंग क्लासेस सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपप्रणीत कोचिंग क्लासेस असोसिएशनने केली आहे.
भाजपप्रणीत कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने काळ पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी हा निर्णय जाहीर करण्यात आला. गेल्या दीड वर्षांपासून शहरातील १ हजार खासगी कोचिंग क्लासेस बंद आहेत. त्यामुळे शिकवणी घेणारे प्राध्यापक व शिक्षक यांचे उत्पन्न थांबले आहे. यात जवळपास १० हजार शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच तसेच क्लासेसचे भाडे, शिक्षकांचे पगार, घराचे हफ्ते, बँकांचे कर्ज, मुलं-मुलींचे शिक्षण, असे सर्वच खर्च थकलेले आहेत. यामुळे संचालकांवर उपासमारीची नव्हे तर आत्महत्येची वेळ आले आहे, असे प्रदेशाध्यक्ष प्रा. पांडुरंग मांडकीकर यांनी सांगितले.
तसेच या दरम्यान कारवाई झाल्यास क्लासेस संचालक, विद्यार्थी व पालकांसमवेत जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा यावेळी असोसिएशनच्या वतीने राज्य सरकारला देण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दळवी, प्रा. योगेश रोजेकर, प्रा. प्रणव जोशी आदींची उपस्थिती होती.