हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना व्हायरस चे प्रमाण कमी आलं असतानाच आता एक नवी बातमी समोर येत आहे. दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींनी देखील या विषाणूची दखल घेत काही निर्देश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यानी आपली प्रतिक्रिया दिली.
अजित पवार म्हणाले, “आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. उद्या पंतप्रधान देशातील मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. राज्यात नवीन व्हेरिएंट आला तर काही बंधन आणावी लागतील अशी स्थिती आहे. आता शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करत आहोत. तसेच १ डिसेंबर पासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत.
दरम्यान, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या कोरोना व्हेरिएंटची दखल घेत राज्य सरकारला आदेश दिले. दक्षिणआफ्रिकेसह इतर देशातून भारतात विमानतळावरून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइनद्वारे बैठकीला सुरुवात झाली. यावेळी विविध आरोग्य विभागाचे विविध देशातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.